हिंगोलीतील ‘त्या’ कोरोना बाधित जवानांचा रुग्णालयात गोंधळ

राजेश दारव्हेकर
Friday, 8 May 2020

भरती केलेले जवान बेडवर न थांबता वॉर्डात व रुग्णालयाच्या गच्चीवर बिनधास्तपणे मुक्त संचार करीत असल्याचे व्हिडीओ क्लिपद्वारे निदर्शनास आले आहे. त्यांची ही क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झालेली असल्याने रुग्णालय परिसरातील वास्तव्यास असलेल्या कुटूंबियात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हिंगोली : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले कोरोना बाधित जवान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अडचणी येत असून, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी राज्यराखीव दलाच्या समादेशकांकडे केली आहे.  

राज्य राखीव दलाच्या समदेशकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, आपल्या अधिनस्त असलेल्या मालेगाव, मुंबई येथून बंदोबस्तावरून परतलेल्या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर आयसोलेशन वॉर्डात भरती केलेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भरती केलेले जवान बेडवर न थांबता वॉर्डात व रुग्णालयाच्या गच्चीवर बिनधास्तपणे मुक्त संचार करीत असल्याचे व्हिडीओ क्लिपद्वारे निदर्शनास आले आहे. त्यांची ही क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झालेली असल्याने रुग्णालय परिसरातील वास्तव्यास असलेल्या कुटूंबियात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा - पाणीटंचाईच्या झळा : अठ्ठावीस विहिरींचे अधिग्रहण...कुठे वाचा

यापूर्वी देखील मंगळवारी (ता. पाच मे )जवानांचा असाच काहीसा प्रकार समोर आल्याने परिचारिका यांनी रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. याशिवाय कामगार सेवकांनी, जवानांची समजूत घातली असता जवानांनी उद्धटपणे वागून तुम्हाला काय करायचे ते करा, आम्हाला कोरोना झाला आहे. तुम्हाला पण संसर्ग केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे या कोरोनाबाधित जवानांवर उपचार कसे करावेत असा प्रश्न रुग्णालयातील डॉक्टर ,परिचारिका यांना पडला आहे.

रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये दहशत 
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जवानांच्या गैरवर्तणुकीमुळे कामगार व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होत आहे. कोरोना सारख्या अतिसंसर्गिक आजाराचे स्वरूप लक्षात घेता उपचार व प्रतिबंध करण्यासाठी देशाचे संरक्षण करणाऱ्या जवांनाकडून अशी अपेक्षा नव्हती. या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने या गोंधळ घालणाऱ्या जवानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशकांकडे लेखी पत्राद्वारे गुरुवारी केली आहे. 

येथे क्लिक करा - बटाट्याच्या दोन एकर शेतात सोडली जनावरे...कुठे वाचा

जिल्हाधिकाऱ्यांनी समादेशकांना दिली तंबी
आता राज्य राखीव दलाचे समदेशक या दहशत घालणाऱ्या जवानांवर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी देखील या प्रकाराची दखल घेतली.  हा प्रकार खूप गंभीर असून त्यांनी समादेशक यांना चांगलेच धारेवर धरून त्यांची खरडपट्टी काढली. तातडीने या जवानांवर कारवाई करा अन्यथा असा प्रकार पुन्हा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli Trouble In The Hospital Of The Jawans Hingoli News