परभणी जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे गंभीर आदेश...

गणेश पांडे
शुक्रवार, 29 मे 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरल्याचे उघड झाले आहे.

परभणी ः कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता जिल्हा शासकीय रुग्णालयातील चालणाऱ्या कामावर महसूलच्या अधिकाऱ्यांचा वॉच असणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संबंधितांना तसे आदेश दिले आहेत.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूंची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. चौथ्या टाळेबंदीच्या काळात सर्वाधिक रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. जस जसे रुग्ण सापडत गेले तस तसे जिल्हा शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभाराचे एक एक किस्से बाहेर पडत आहेत. स्वॅब तपासणी अहवातील तफावत तर रोजचीच आहे. कधी रुग्ण कमी, तर पाठविलेले स्वॅब कमी, तर एकूण रुग्णांच्या आकडेवारीशी दाखल रुग्णांची आकडेवारी विसंगत ठरते. त्याच बरोबर जिल्ह्यात विलगीकरण करण्यात आलेल्या पोलिस कर्मचारी व इतर सर्वसामान्य लोकांचे स्वॅब घेण्यास होणारी टाळाटाळदेखील चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे एकंदरच जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमुख म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांचा कारभार किती नियोजनशून्य आहे याची प्रचिती येते.

परिचारिकांनी घातला होता घेराव 
जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत एका परिचारिकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. या परिचारिकेने स्वॅब अहवाल येण्याअगोदर तीन दिवस रुग्णालयातील कक्षात सेवा दिली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. याचा परिणाम म्हणून परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. २८) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांना घेराव घालून संरक्षक साहित्याची मागणी केली होती. परंतु, याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी गांभीर्याने पाहिले नाही. ही बातमी जेव्हा प्रसिद्धी माध्यमांपर्यत पोचली तेव्हा मात्र, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना पळता भुई थोडी झाली. यावर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने लक्ष घातले असल्याचे समजत आहे.

जबाबदार अधिकारी लक्ष ठेवतील
स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर धरत आरोग्य विभागाच्या कामासंदर्भात प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते. जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे आता महसूल यंत्रणेला यावर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन रुग्णालयाच्या कारभारावर आता महसूलचे बडे व जबाबदार अधिकारी लक्ष ठेवतील, असे आदेश दिले असल्याचे समजते.

हेही वाचा - मराठवाड्याच्या भुमिपुत्राकडून परभणीला मोठ्या अपेक्षा

विभागीय आयुक्तांचा होऊ शकतो दौरा
जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचे किस्से आता थेट मंत्रालयापर्यंत पोचले आहेत. त्यामुळे याची पाहणी करून चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचा पाहणी दौरा दुसऱ्यांदा परभणी शहरात येणार असल्याचे समजते. हा पाहणी दौरा केवळ आरोग्य विभागातील भोंगळ कारभार बंद करण्यासाठी व त्यावर वॉच राहण्यासाठीच असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - उमेदमुळे तीच्या कर्तृत्वाला मिळाली लॉकडाऊनमध्ये भरारी

३०९ स्वॅब अद्यापही प्रलंबितच
जिल्ह्यातील स्वॅब तपासणीची प्रक्रिया अंत्यत संथ गतीने होत आहे. जिल्ह्यात अजूनही ३०९ स्वॅबचे अहवाल प्रलंबित असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे परभणीकरांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात आज घडीला दोन हजार २८२ स्वॅब घेण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक हजार ८१९ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. त्यात ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. ता. २९ मे रोजी नव्याने ८० स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector's Serious Orders Regarding The Management Of The District Hospital, parbhani news