शिधापत्रिका आधारशी लिंक न झाल्यास होऊ शकते रद्द ; 31 जानेवारीपर्यंत आधार सिडिंग करावे

गणेश पांडे 
Wednesday, 6 January 2021

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केसरी) शेतकरी योजनेच्या सुमारे १४.९० लक्ष लाभार्थ्यांपैकी ८६.७० टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले आहे.

परभणी : जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील ई-पास उपकरणामधील शपथपत्राद्वारे आधार सिडींग व मोबाइल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. रविवार (ता. ३१) जानेवारी पूर्वी प्रत्येक शिधापत्रिकेत लाभार्थ्यांचे १०० टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिडिंग करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल (केसरी) शेतकरी योजनेच्या सुमारे १४.९० लक्ष लाभार्थ्यांपैकी ८६.७० टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले आहे. शासन निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सिडिंग सुधारणे आवश्यक आहे. माहे जानेवारी २०२१ चे धान्याचे वाटप करतेवेळी ई-पास उपकरणाद्वारे स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत कुटुंबातील सदस्यांचा आधार सिडींग नसल्यास अशा सदस्यांचा आधार व मोबाईल क्रमांकाच्या लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानदाराच्या ठिकाणी जाऊन सिडिंग पूर्ण करून घ्यावे असेही श्रीमती मुथा यांनी सांगितले. (ता. ३१) जानेवारीपर्यंत आधार सिडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मराठवाड्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

लाभार्थी अन्नधान्यपासून वंचित राहू नये, यासाठी (ता. ३१) जानेवारीपूर्वी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक सिडींग १०० टक्के पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी केले आहे. ज्या शिधापत्रिकावर मागील तीन महिन्यात धान्य उचलण्यात आलेले नाही, अशा सर्व शिधापत्रिका तपासणीअंती तात्पुरती निलंबित करण्यात येईल. किंवा धान्य अनुदान नसलेल्या योजनेत वर्ग करण्यात येणार आहे. तरी अन्नधान्य लाभासाठी अशा शिधापत्रिका धारकांच्या कुटुंब प्रमुखांचे लेखी निवेदन तहसीलदार यांना प्राप्त झाल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार सिडींग करून या शिधापत्रिका पात्र योजनेखाली समाविष्ट करण्यात येतील.

सलग तीन महिने धान्य उचलण्यात न आलेल्या सर्व शिधापत्रिका जानेवारी २०२१ नंतर चौकशीअंती कायमस्वरूपी निलंबित करण्यात येईल. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जमा करून आधार सीडींग व मोबाईल सिडींग ३१ जानेवारी पूर्वी पूर्ण करावेत.
- मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी, परभणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District supply officer manjusha mutha has informed that aadhar siding should be done by january 31 so that the ration card can be canceled if it is not linked to aadhar