‘या’ जिल्ह्यात देहदानाच्या लोक चळवळीला आली गती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

गत तीन वर्षांमध्ये नांदेडच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात नांदेड-१६, परभणी-पाच, हिंगोली-दोन तर यवतमाळ-एक अशा व्यक्तिंचे देहदान दिलेले आहे. तर अवयव दानाचा संकल्प करणाऱ्या चार हजार २०० जणांनी वचनपत्र वैद्यकिय महाविद्यालयाकडे दिलेले आहे.

नांदेड : शासन तसेच काही सामाजिक संघटना तसेच काही व्यक्ती वैयक्तिक पातळीवर अवयव, देहदानाचा प्रसार, प्रचार करीत आहेत. त्यांना यशही येत असून, त्याचे परिणामही दिसून येत आहे. गत तीन वर्षांत नांदेड जिल्ह्यात सहा अवयवदान केले असून मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणी त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. तसेच २४ व्यक्तींनी देहदान केले आहे. समाजामध्ये आता अवयवदानाचे महत्त्व कळू लागले असून, त्याला प्रतिसादही मिळत असल्याचे प्रचारक माधव अटकोरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
 
त्यांनी सांगितले की, ‘मातीला मिळणार शेवटी...मातीला मिळणार’ हे मानवाचे जीवन केव्हाही क्षणभंगूर ठरणारा नियम आहे. मानव जसा जन्मतो तसाच मृत्यू देखील अटळ आहे. परंतु, ‘मरावे परी किर्तीरूपी उरावे’ या सिद्धांतानुसार शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाकडे तीन वर्षात २४ व्यक्तींनी देहदान केले आहे. तर चार हजार २०० व्यक्तींनी देहदान व अवयव दानाचा संकल्प केलेले वचनपत्र दिले आहे. यातील तीन हजार वचनपत्रे मी स्वतः घेऊन संबंधित शासकीय रुग्णालयांत दिले असल्याचेही श्री. अटकोरे यांनी स्पष्ट केले.

लोकचळवळ झाली गतीमान
नांदेडच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाकडे एकेकाळी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूणे येथून ‘शव’ मागवावे लागत असे. परंतु, अवयव, देहदानविषयी समाजामध्ये प्रचार, प्रसार झाल्याने २८ जून २०१६ ते एक डिसेंबर २०१९ पर्यंत २४ व्यक्तींनी देहदान केले आहे. यात यशवंत खरे, देविदास कुलकर्णी, बाबूराव महाराज, कमलाकर उन्हाळे, सुमतीबाई पांडे, सुभद्राबाई बेदरकर, रमाकांत मोताफळे, गोकुळाबाई चंदन, विना दुधमांडे, जगदेवराव नाईक, शंकर सावळे, मनोहर काळे, रामदास गवळे, दर्शनानंद चौसाळकर, शिवाजी शिराढोणकर, गणपतराव ईसादकर, उल्हास लाटकर, एन. यु. सदावर्ते, केशव चंदन, प्रभाकर बाकळे, इंदिराबाई पांडे, एकनाथ हुंबे, विजया कुलकर्णी, मारोती पिसाळ आदींचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयात या देहदात्यांवर अभ्यास करून शेकडो डॉक्टर घडले आहेत. जिल्ह्यात तीन वर्षामध्ये देहदान व अवयवदानाची लोक चळवळीने गती घेतली आहे.

तीन लाखांचे पुस्तके दिली मोफत
अवयवदानाची लोक चळवळ समाजात रुजावी यासाठी आतापर्यंत तीन हजार अवयव दात्यांकडून संकल्पीत वचनपत्र^भरून घेतले आहेत. ती विविध वैद्यकिय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले. अवयव दान पार्थिवाचे देणे हे ३०० पानाचे पुस्तक लिहून लोकजागृती केली. राज्यातील मंत्री, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसह दोन हजार व्यक्तींना तीन लाखांची मोफत पुस्तके दिली. समाजाने देहदान व अवयवदान करावे, यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून जनजागृती करत असल्याचे माधव अटकोरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In 'this' district, there was a movement of people of the body