हिंगोलीत दिवाळीचा बाजार फुलला, खरेदीसाठी नागरिक बाजारात

राजेश दारव्हेकर
Wednesday, 11 November 2020

आकाशदिवे , पणत्या , लायटिंग , लक्ष्मीपूजनासाठी देवीच्या मूर्ती व साहित्यासह कपडे खरेदीसाठी दुकानात गर्दी झाली होती.

हिंगोली : अवघ्या दोन  दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे. सहा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेली बाजारपेठ आता पूर्वपदावर आली आहे. दिवाळीसाठी लागणारे साहित्य खरेदीची लगबग सुरु आहे. उद्या वसुबारसे दिवाळी पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बुधवार (ता. ११) बाजारात आकाशदिवे , पणत्या , लायटिंग , लक्ष्मीपूजनासाठी देवीच्या मूर्ती व साहित्यासह कपडे खरेदीसाठी दुकानात गर्दी झाली होती.

दिव्यांचा सण असल्यामुळे यासाठी लागणारे आकाश कंदिल खरेदी केले जात आहेत. विविध प्रकारांतील कापड, प्लॉस्टिकचे आकाशदिवे  विक्री होत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. यावर्षी लायटिंग असलेल्या नव्याने आलेल्या आकाशदिव्यांना मोठी पसंती मिळत आहेत. शंभर  ते पाचशे रुपयांपर्यंत याच्या किमती आहेत. तर थ्री डी पणतीलाही सर्वाधिक मागणी आहे. पारंपरिक पणती, बोळके खरेदी केली जात आहे. कोरोनामुळे पणती, आकाश दिव्यांच्या किंमतीत कुठलीच वाढ करण्यात आलेली नाही. यासह आकर्षक असे तोरण खरेदीलाही मोठी मागणी असल्याचे  विक्रेते पंकज दुबे यांनी सांगितले. 

हेही वाचा  जिंतूरात मुख्य रस्त्यावर तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या : चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान.

कापड मार्केटमध्येही गर्दी झाली आहे. लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न व्यापारी, दुकानदार करीत आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यासाठी कापड व रेडिमेड विक्रेत्यांनी सवलती दिल्या आहेत. जवळपास २० ते ३० टक्के सुट जाहिर केल्यामुळे नागरिक खरेदी करीत आहेत. दसर्यापासून कपडा मार्केटमध्ये रेलचेल आहे. जवाहररोड, कपडा मार्केट, गांधी चौक या भागातील दुकानांत बुधवारी  गर्दी झाली होती. कापड्याच्या किंमतीही स्थिर असल्याचे विक्रेत्यांना सांगितले .

सराफा मार्केटमध्ये देखील सोन्याला झळाळी आली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, बोनस मिळाल्याने अनेकांनी सोने खरेदीला पंसती दिली आहे. दहा ग्रँम सोन्याचा भाव ५२ हजार ४०० तर एक किलो चांदीचा भाव ६३ हजार ९०० रूपये असल्याचे विक्रेते सांगत आहेत. यासह किराणा व रेडिमेड फराळ देखील खरेदी होत असल्याचे चित्र बाजारात होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Diwali market in Hingoli flourished, with the citizen market for shopping hingoli news