असे करा वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण

प्रमोद चौधरी
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

नीलगाय, रोही, अस्वल, रानडुक्कर आणि हरणांकडून मोठ्या प्रमाणावर शेतातील पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. त्यावर पारंपरिक पद्धतीने वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण कसे करू शकतो, याची कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी मांडणी केली आहे. 

नांदेड :  आजकाल बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांकडून पिकांचे व पाळीव प्राण्यांचे वन्य जिवांपासून रक्षण करण्यासाठी विविध देशी तंत्रज्ञान पद्धतीचा वापर केला जात आहे. स्थानिक लोकांकडून विकसित केल्या गेलेल्या या पद्धतीचे वैज्ञानिक स्तरावर विश्‍लेषण करण्यात येऊन बऱ्याच प्रमाणात प्रभावी व परिणामाकारक ठरत आहे.  

सद्यःस्थितीत नांदेड जिल्ह्यात किनवट व माहूर तालुक्यात, तसेच भोकर व अर्धापूर तालुक्यात हळद, केळी, ऊस तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांची पेरणी करताना, शेतातील कामे करताना त्यांच्याना नीलगाय, रोही, अस्वल, रानडुक्कर, हरणांकडून हल्ले होत आहेत. पारंपरिक पद्धतीने आपण वन्य प्राण्यांपासून पिकांचे व शेतीचे संरक्षण निश्‍चितच करू शकतो. 

हेही वाचा - ज्वारीच्या पिकावर ‘पोंगेमर’चा प्रादुर्भाव !

१) गावठी डुकरांची विष्ठा पसरविणे
प्रादेशिकता जी की रानडुकरांमध्ये जास्त असते. त्या तंत्रज्ञानाचा या पद्धतीत वापर केला जातो. यामध्ये स्थानिक रानडुकरांपासून गोळा केलेल्या विष्ठेचे द्रावण तयार करून मातीवर शिंपडले जाते. ज्याचे अंतर पिकांपासून एक फूट एवढे असते. त्यामुळे रानडुकरांमध्ये आपण इतर डुकरांच्या सीमेत प्रवेश केला आहे, याचा भास होतो. त्यामुळे ते प्रादेशिकवाद टाळण्यासाठी तेथून काढता पाय घेतात. याच्या प्रभावी व दीर्घकाळ परिणामाकरिता दोन ते तीन पंप आठवड्याच्या अंतराने फवारणी अपेक्षित आहे.

हेही वाचा - ‘या’ जिल्ह्यात गर्भवती महिलांना धान्य वाटपाचे पोषण

२) मानवी केसांचा श्‍वास रोधक म्हणून वापर
रानडुकरांना त्यांच्या अविकसित दृष्टी आणि श्रवण क्षमतेमुळे ज्ञानेंद्रीयाच्या मदतीनेच आपल्या निवारा व अन्नाचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे ते श्‍वास घेतच निवारा व अन्नाचा शोध घेतात. स्थानिक केस कापण्याच्या दुकानातून मानवी केस गोळा करून आपण रानडुकरांचा प्रभावीपणे बंदोबस्त करू शकतो. ही पद्धत अत्यंत कमी खर्चाची आहे. शेतात हे मानवी केस विस्कटून सर्वदूर पसरविल्याने अन्नाच्या शोधात येणाऱ्या रानडुकरांच्या श्‍वसन नलिकेत हे केस अडकतात आणि ते सैरावैरा धावायला लागतात. अनेक शेतकरी हा प्रयोग करत असून, रानडुकरांमुळे होणाऱ्या पिकांचे नुकसान त्यांनी ७० ते ८० टक्क्यांवर आणलेले आहे.

 

३) रंगीत साड्या पिकांभोवती बांधणे
ही पद्धत सुद्धा शेतकऱ्यांनी संशोधित केलेली आहे. ज्यामुळे रानडुकरांच्या वर्तवणूक पार्श्‍वभूमीचा वापर केला गेला आहे. या पद्धतीत विविध रंगांच्या साड्या पिकांच्या भोवती रोवल्या जातात. त्यामुळे रानडुकरांना शेतात कुणीतरी मानव असल्याचा भास होतो. त्यामुळे ते शेतात प्रवेश करू शकत नाही. या पद्धतीचा जिथे मानवाची रेलचेल किंवा येणे-जाणे जास्त आहे, अशा भागात जास्त वापर होतो. यामुळे रानडुकरांमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत कमी करता येते.

हेही वाचा - किटक नाशके खरेदी व वापर करताना ‘ही’ घ्यावी काळजी

४) वाळलेल्या शेणाच्या गौऱ्या जाळणे
स्थानिक डुकरांपासून किंवा त्यांच्या विष्ठेपासून तयार केलेल्या गौऱ्या मातीच्या भांड्यात जाळून व त्याचा धूर करून सुद्धा आपण रानडुकरांना पळवू शकतो. या पद्धतीत धूर हळूहळू पसरून रानडुकरांना पळविले जाते. या पद्धतीचा वापर मुख्यतः सायंकाळी केला जातो. या पद्धतीत धुराचा वास येताच शेतात प्रवेश केलेल्या रानडुकरांना अगोदरच उपस्थित असलेल्या डुकरांचा आंदाज येतो. त्यामुळे ते भौगोलिक वाद टाळण्यासाठी तेथून पळ काढतात.

 

५) आवाज निर्मिती
रानडुक्कर आणि इतर वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी बांधव विविध पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतात. जसे की, फटाक्यांचा वापर, स्थानिक ड्रम, रिकामे कॅन पत्राचे भांडे, जाळ करणे आणि जोरजोरात ओरडणे या पद्धतींचा वापर करतात.

हेही वाचा - ‘या’ जिल्ह्यात हळद रुसली

६) श्‍वानांचा वापर
काही वेळेस शेतकरी पिकांचे वन्य प्राणी आणि रानडुकरांपासून रक्षण करण्यासाठी पारंपरिक स्थानिक कुत्रे पाळतात. ज्यांच्या मदतीने या रानडुकरांना पळविले जाते व पिकांचे नुकसान टाळले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do this to protect crops from wild animals