
वसमत, कळमुनरी व औंढा तालुक्यातील दहा ते पंधरा गावांत सोमवारी रात्री साडेदहा वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचेवातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
हिंगोली : वसमत, कळमुनरी व औंढा तालुक्यातील दहा ते पंधरा गावांत सोमवारी रात्री साडेदहा वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्याची रिश्टर स्केलवर ३.४ नोंद झाली आहे. मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेसातनंतर एकापाठोपाठ एक असे तीन आवाज आले. यात कोणतीही हाणी झाली नसली तरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता. वसमत) येथे अनेक वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत आहेत. रविवारी (ता. २६) सकाळी त्यांनतर सोमवारी (ता. २७) रात्री साडेदहा वाजता तीन वेळेस आवाज आले. त्याची रिश्टर स्केलवर ३.४ अशी नोंद झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे रोहिज कंजे यांनी सांगितले.
हेही वाचा - धक्कादायक : हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागन, संख्या पोहचली १६ वर
वसमत, औंढा तालुक्याचा समावेश
दरम्यान, या आवाजामुळे सोमवारी रात्री वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, खारपखेडा, कुरुंदा, कोठारी, गिरगाव, कुरुंदा, चोंढीआंबा, बोरगाव खुर्द, मुरुंबा, खाजमापूरवाडी, माळवटा, पार्डी बुद्रुक, पांगरा बोखारे, खांबाळा, डोणवाडा, सुकळी, औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, सोनवाडी, आमदरी, येहळेगाव सोळंके या गावातील ग्रामस्थ सुरक्षीततेसाठी घरबाहेर पडले.
रात्र जागून काढली
तर कळमनुरी तालुक्यातील पोतरा, सिंदगी, कवडा, टव्हा, निमटोक, पेठवडगाव, बोथी, गोर्लेगाव, बिबथर, नांदापूर, हारवाडी, तेलंगवाडी, सापळी, भुरक्याची वाडी, कोपरवाडी, दांडेगाव, बोल्डा, येहळेगाव गवळी, असोला आदी गावांतील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.
जनजागृती करण्यास सुरवात
भूकंप झाल्यास काय करावे, यावर चर्चा केली जात होती. त्यामुळे प्रशासनाने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यास सुरवात केली आहे. भूकपांच्या धक्क्यामुळे घाबरून न जाता आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
भूकंपाचे धक्के जाणवत असल्यास काय करावे
- भूकंपाचे धक्के कमी होईपर्यंत मोकळ्या जागेवर थांबा.
- घरामध्ये आसाल तर अभ्यासाचा टेबल किंवा कोणत्याही एखाद्या फर्निचरखाली जाऊन स्वतःला झाकून घ्या.
- तुमच्या आसपास टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्याभोवती गुंडाळून त्यात तुमचा चेहरा झाकून घ्या.
- दरवाज्याची चौकट, खोलीचा कोपरा, टेबल किंवा पलंगाच्या खाली थांबून स्वतःचे रक्षण करा.
याकडेही लक्ष द्या
- जवळ असणाऱ्या एखाद्या मजबूत प्रवेशद्वाराचा निवाऱ्यासाठी वापर करा.
- पंखा, बल्ब व इतर विद्युत उपकरणे भूकंपादरम्यान इजा होणार नाही अशा जागी सुरक्षित ठिकाणी बसवावेत
- दवाखाना, पोलिस स्टेशन, अग्निशमन दल आदी अत्यावश्यक सेवेचे दूरध्वनी क्रमांक जवळ बाळगावेत
येथे क्लिक करा - कोरोनाच्या संकटानंतर आता गारपीटीचे संकट...कोठे वाचा
काय करू नये...
- काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे, भींती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा.
- छतावरील एखाद्या अवजड वस्तूपासून लांब राहा.
- विद्युत उपकरणापासून लांब राहा.
सूचनांचे पालन करावे
कळमनुरी तालुक्यातील काही गावांत सोमवारी (ता.२७) रात्री भूकंपाचे सौम्य स्वरूपाचे धक्के बसले आहेत. यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. भूकंपासारख्या आपत्तीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी प्रशासनातर्फे दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास हानी टळण्यास मदत होणार आहे.
- प्रशांत खेडेकर, उपविभागीय अधिकारी, कळमनुरी