
डॉ. सुदाम मुंडेला चार वर्षे सक्तमजुरी
अंबाजोगाई : शासकीय कामात अडथळा, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपात डॉ. सुदाम मुंडे यास दोषी ठरवून येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी बुधवारी (ता.२३) हा निकाल दिला.
महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याच्या आरोपात डॉ. सुदाम मुंडेला औरंगाबाद खंडपीठाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने पाच वर्षांसाठी वैद्यकीय व्यवसाय न करण्याचा अटीवर जामीन दिला होता. तरीही त्याने वैद्यकीय व्यवसाय चालू ठेवला होता. तशा तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यावरून बोगस डॉक्टर शोध समितीने परळीतील रामनगर येथे ५ सप्टेंबर २०२० ला डॉ. सुदाम मुंडेच्या दवाखान्यावर छापा मारला होता. त्यावेळी तिथे चार रुग्ण उपचार घेताना निदर्शनास आले. छाप्यात वैद्यकीय व्यवसायाचे साहित्य, उपकरणेही सापडली. ही कारवाई करणाऱ्या पथकात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार डॉ. बिपीन पाटील, डॉ. कुर्गे, डॉ. मेढे आदींचा सहभाग होता.
छाप्यादरम्यान डॉ. मुंडेने डॉ. थोरात यांना अर्वाच्च शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. या प्रकरणी डॉ. मुंडेच्या विरोधात परळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. पोलिस निरीक्षक हेमंत कदम, सहायक निरीक्षक एकशिंगे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) व्ही. के. मांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपात डॉ. मुंडेला चार वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, वैद्यकीय व्यवसाय कायद्यान्वये तीन वर्षे शिक्षा, इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्यान्वये एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ॲड. अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. नितीन पुजदेकर, कोर्ट पैरवी गोविंद कदम व पोलिस कर्मचारी मंदा तांदळे यांनी सहकार्य केले.
Web Title: Dr Sudam Munde Sentenced To 4 Years Hard Labor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..