चाऱ्याच्या गाड्या अडकल्या कुठे?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखालील हंडा मोर्चाने सोमवारी सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वेगाड्या तयार ठेवल्या असल्याची विधिमंडळात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती; मग या रेल्वे कुठे अडकल्या, असा सवाल शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी येथे केला.

औरंगाबाद - पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखालील हंडा मोर्चाने सोमवारी सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वेगाड्या तयार ठेवल्या असल्याची विधिमंडळात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती; मग या रेल्वे कुठे अडकल्या, असा सवाल शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी येथे केला.

दुष्काळी स्थितीमुळे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. सामान्यांच्या प्रश्‍नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हंड्यालाच आपल्या मागण्यांचे स्टीकर लावत मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्यात १९७२ पेक्षा मोठा दुष्काळ असताना राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. जिल्ह्यातील खरिपासोबतच रब्बीचीही पिके गेली आहेत. त्यामुळे खाण्यासाठी घरात धान्याचा दाणाही शिल्लक नाही. पशुधन वाचविण्यासाठी चारा नाही. शेतमजुरांना काम नाही.चाऱ्याच्या रेल्वेगाड्या तयार ठेवल्याची घोषणा जानकर यांनी विधानसभेत केली होती. मात्र  त्या गाड्या कुठे अडकल्या माहीत नाही. त्यामुळे चारा आता छावणीला नव्हे, तर दावणीला देण्याची गरज आहे. तसेच शेतकरी, मजुरांना विशेष कोट्यातून धान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought handa Rally Water Shortage Fodder Vehicle