esakal | दुष्काळी अनुदानासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

पैठण : शेतकरी आंदोलकांना मंगळवारी अनुदान वाटपाचे आश्वासन देताना महेश सावंत.

शासनाचे दुष्काळी अनुदान मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी करून हे अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी (ता. तीन) तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी एका शेतकऱ्याने पेट्रोल बाटलीत आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; परंतु वेळीच पोलिसांनी या आंदोलक शेतकऱ्याला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शासनाने दिलेले अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.

दुष्काळी अनुदानासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पैठण (जि.औरंगाबाद) : शासनाचे दुष्काळी अनुदान मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी करून हे अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी (ता. तीन) तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी एका शेतकऱ्याने पेट्रोल बाटलीत आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; परंतु वेळीच पोलिसांनी या आंदोलक शेतकऱ्याला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शासनाने दिलेले अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.

तलाठ्यांकडून बॅंक खाते क्रमांकाबाबत झालेल्या चुका व गोंधळामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अरुण काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून ठिय्या मांडला व तहसीलच्या मनमानी कारभाराविरुद्ध निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख फौजफाट्यासह तेथे गेले. यावेळी खादगाव (ता. पैठण) येथील लियाकत शेख या शेतकऱ्याने हातात पेट्रोलने भरलेली प्लॅस्टिकची बाटली घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच शेतकऱ्याला ताब्यात घेतले व पेट्रोलची बाटली जप्त केली. दरम्यान, अनुदान वाटपात लक्ष घालून यादीत अनुदान मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने त्याचे वाटप केले जाईल, असे आश्वासन तहसीलदार महेश सावंत यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.


आंदोलनात लक्ष्मण बोबडे, शिवनाथ शिंदे, दिनेश पांगरे, ग्रामपंचायत सदस्य भरत पाचे, संदीप गाढे, बबनबाई बोरुडे, दादासाहेब गोर्डे, नीलाबाई वाघचौरे, बबन ठोंबरे, दत्तात्रय मोरे, मंदाबाई राठोड, मनोहर गोरे, बाबूराव वाकडे रामनाथ दहिहंडे, रुक्‍मिणी जनार्दन नवथर, अनिता दादासाहेब म्हस्के, लक्ष्मण पांगरे आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनात महिला शेतकरी
दुष्काळी अनुदान वाटपासाठीच्या मागणी आंदोलनात पैठण तालुक्‍यातील महिला शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी अनुदान मागणीच्या घोषणा देऊन अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला.

loading image
go to top