'पैशाच्या जोरावर दुष्काळ हटणार नाही'

सुशांत सांगवे 
Wednesday, 29 May 2019

सामाजिक भान ठेऊन दुष्काळ हटविण्यासंदर्भात अभ्यासपूर्वक नियाेजन करायला हवे, असे स्पष्ट मत हिवरेबाजारचे सरपंच, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

लातूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी हा दुष्काळ हटविण्यासाठीचा अंतिम उपाय नव्हे. ती तात्पुरती मलपट्टी आहे; पण सध्याच्या काळात ती गरजेचीच आहे. दुष्काळ हा पॅकेजच्या किंवा पैशाच्या जोरावर हटणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून दीर्घकालीन योजना करायला हव्यात. नुसत्याच ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ किंवा गुत्तेदारांच्या हिताचे कार्यक्रम हातात घेऊन चालणार नाही. सामाजिक भान ठेऊन दुष्काळ हटविण्यासंदर्भात अभ्यासपूर्वक नियाेजन करायला हवे, असे स्पष्ट मत हिवरेबाजारचे सरपंच, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

पवार हे सध्या लातूर दाैऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, दुष्काळ हा आत्ताच आहे, असे नाही. राजा-महाराजा, संत, राष्ट्रपुरुष यांच्या काळातसुद्धा दुष्काळ होताच. 1972 मध्येही आपण दुष्काळ अनुभवला आहे; पण याआधीचे दुष्काळ ‘पाणीदार’ पद्धतीचे होते. यंदाचा दुष्काळ पाणी नसलेला आहे. तो ऑगस्टपासून सुरू झाला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. श्रीमंत होण्यासाठी भुजलाचा हव्यास किती ठेवायचा, याचा गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे.

पूर्वी पीक पद्धती खरीपावर होती. पाऊस पडला की तेवढेच आपण पिकवत होतो. मग खरीपाकडून रब्बीकडे गेलो. भूजलाचा वापर करून बारमाही शेतीकडे वळलो. याचा परिणाम भूजलावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. आता तर भूजल धोकादायक पातळीवर आले आहे. निव्वळ जलसंधारण करून प्रश्‍न सुटणार नाही. पाणी नियाेजन, पीक नियोजन करायला हवे. जमिनीत पाणी किती आहे, हे पाहून पिक घेतले पाहीजे. मात्र, जमिनीखाली खूप पाणी आहे, असे अजूनही अनेकांना वाटत आहे. त्यामुळे विंधनविहीरी खोलवर जाऊ लागल्या आहेत. पर्यायाने भूगर्भातील रचना बदलली जात आहे. अशा काळात सामाजिक शिस्त लावणे अधिक गरजेचे आहे, असेही पवार यांनी सांगितले.

समाजाच्या समस्या सोडविणे हा कुठल्याही पक्षाचा अजेंडा असला पाहीजे. पण ऐवढी निवडणूक झाली. एकानेही पर्यावरण, पाणी, दुष्काळ, चारा यावर बोलले नाही. निवडणूक संपताच सर्वांना दुष्काळ आठवू लागला आहे. सामाजिक परिस्थिती किती दुषित झाली आहे, हे यातून कळते.
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव समिती

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the drought will not end due to spending lot of money in farming