
श्री. टोपे म्हणाले की, कोरोनाची लस आल्यानंतर तरी विशिष्ट तापमानामध्ये शितगृहात ठेवली जाईल. त्यानंतर प्रशिक्षक नर्सव्दारे कोरोना लस ही नागरिकांच्या दंडामध्ये सिरीनव्दारे देण्यात येईल.
जालना : संपूर्ण जगाला विखळा घातलेल्या कोरोना विषाणूवर लवकरच लस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण कसे करावे, यासाठी शासनाकडून कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. यामध्ये जालना जिल्हा कोव्हिड रूग्णालय येथे शनिवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाशल्यचिकित्सक यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला सुरवात करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्यक डाॅ. अर्जना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खादगावकर आदींची उपस्थिती होती. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनसाठी तयार करण्यात आलेल्या वार्डासह तयारीची पाहणी केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना श्री. टोपे म्हणाले की, कोरोनाची लस आल्यानंतर तरी विशिष्ट तापमानामध्ये शितगृहात ठेवली जाईल. त्यानंतर प्रशिक्षक नर्सव्दारे कोरोना लस ही नागरिकांच्या दंडामध्ये सिरीनव्दारे देण्यात येईल. कोरोनाची लस दिल्यानंतर त्या नागरिकाला काही त्रास होत आहे का ? हे जाणून घेण्यासाठी काही काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीमध्ये ठेवण्यात येईल, अशी माहिती श्री. टोपे यांनी दिली.
दरम्यान, जालना जिल्ह्यात जालना कोव्हिड रूग्णालय, अंबड उपजिल्हा रूग्णालय, शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी शनिवारी कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला सुरवात झाली आहे. या तीनही ठिकाणी प्रत्येकी 25 जणांवर कोरोना लसीकरणाची रंगीत तालीमला सुरवात झाली आहे. या रंगीत तालीम दरम्यान प्रात्यक्षिकांत कोरोनाची लस दिली जाणार नाही. मात्र, कोरोना लसीकरण करताना कोणती काळजी घ्यावी, लसीकरण कसे करावे याचे प्रात्यक्षिक केले जात आहे. कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेताना आरोग्य अधिकारी, कर्मचारी, नर्स, अंगणवाडी सेविका, पोलिस प्रशासन, ग्रामसेवक आदींना सहभागी करून घेण्यात आला आहे.