esakal | पुरामुळे दुधना नदीकाठासह हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली
sakal

बोलून बातमी शोधा

dudhna

पुरामुळे दुधना नदीकाठासह हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली

sakal_logo
By
संजय मुंडे

वालूर (परभणी): निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी दुधना नदीच्या पात्रात सोडल्याने नदीच्या काठावरील अनेक गावातील शेत शिवारातील पिक पाण्याखाली गेली. तालुक्यातील अनेक भागात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढ्या-नाल्यांना पूर आला. यामुळे हजोरो हेक्टर शेतातील पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शेतकरी कुटुंबात चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी (ता.७) तिसर्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे.

मंठा, परतुर तालुक्यासह निम्न दुधना धरण प्रकल्प क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ सुरू झाला आहे. धरणाचे रविवारी (ता.५) सोळा दरवाजे उघडण्यात आल्यामुळे दुधना नदीच्या पात्रात जवळपास २३ हजार आठशे क्युशेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. रात्री परत दोन दरवाजे उघडण्यात आले. मोठ्या प्रमाणात नदीला पूर आल्याने मोरेगाव, राजेवाडी, इरळद गावाजवळील दुधना नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने सेलू-देवगावफायटा, वालूर-सेलू , वालूर- मानवत रोड या तीनही मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.

हेही वाचा: Parbhani Rain: येलदरी ९५ टक्क्यांवर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दुधना नदीला पूर आल्याने खादगाव, ब्रम्हवाकडी, मोरेगाव, वाघपिंपरी, खुपसा, खेर्डा, राजा, राजेवाडी, राजा, ब्राम्हणगाव, सोन्ना, वलंगवाडी आदी गावातील शेत शिवारातील पिकात पाणी शिरले आहे. यामुळे कापूस, सोयाबीन, तुर आदी खरिपाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. तालुक्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढ्या-नाल्यांना पुर येऊन अनेक गावातील शेतातील पिकांना फटका बसला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे व सतत मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्वच महसूल मंडळातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तहसीलदारांकडून पाहणी-

सतत मुसळधार पावसाने व दुधना नदीच्या पुरामुळे नदी काठावरील काही गावातील शेतीचा झालेल्या नुकसानीची पहाणी तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी सोमवारी (ता.६) करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.

दोन मार्गावरील वाहतूक बंदच-

पावसाचा जोर कमी होत नसल्याने वालूर-सेलू रस्त्यावरील राजेवाडी व वालूर- मानवत रोड इरळद गावाजवळील दुधना नदीच्या पुलावरून पुराचे वाहत असल्याने या दोन्ही मार्गावरील वाहतूक अद्यापही बंद आहे. दरम्यान मोरेगाव- वालूर रस्त्यावरील हातनुर गावाजवळील ओढ्याला अधून मधून पूर येत असल्याने या ठिकाणी दोन ते तीन तास वाहतूक ठप्प होत आहे. मंगळवारी (ता.६) सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी मोठ्या कोसळत असल्याने पावसाचा जोर दिवसभर कायम राहणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

loading image
go to top