esakal | अतिवृष्टीचा तडाखा, तब्बल तेवीस तासांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

2Sakal_20News_11

हणमंतवाडी (ता.निलंगा) येथे स्मशानभूमी शेड नसल्यामुळे दोन दिवसांपासून मृतदेह अंत्यसंस्कार न केल्याने पडून होते.

अतिवृष्टीचा तडाखा, तब्बल तेवीस तासांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : हणमंतवाडी (ता.निलंगा) येथे स्मशानभूमी शेड नसल्यामुळे दोन दिवसांपासून मृतदेह अंत्यसंस्कार न केल्याने पडून होते. तब्बल २३ तासानंतर (दुसऱ्या गावात) बुधवारी (ता. १४) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांसह कुटुंबियांची तारांबळ उडाली होती. निलंगा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची हजेरी आहे. शिवाय रात्री आठ वाजल्यापासून अतिवृष्टी झाली. दिवसरात्र पावसाने पाठ सोडली नाही. याचा फटका जसा शेतीला बसला आहे तसा आता सर्वसामान्यांच्या जीवनावर ही परिणाम झाला आहे.

रस्त्यांवरील वाहतूक बंद; दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त, निलंगा तालुक्याला अतिवृष्टीचा फटका


निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी-अबु येथे रंगराव सुर्यवंशी यांचे मंगळवारी (ता.१२) सकाळी १० वाजता निधन झाले होते. गावात ग्रामपंचयतीची स्मशानभूमी नाही. शिवाय शेडही नाही. त्यामुळे गावात कोणाचा मृत्यू झाला तर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार केले जातात. मात्र दोन दिवस झाले पाऊस थांबत नाही. गावात स्मशानभूमी अथवा शेड असता तर तेथे अंत्यसंस्कार झाले असते. मात्र पाऊस थांबत नसल्यामुळे या अतिवृष्टीचा फटका मृत झालेल्या व्यक्तीलाही बसला. हाणमंतवाडी येथे जवळपास ३०० घरे आहेत. येथे यापूर्वी स्मशानभूमीची कधी जाणीव झाली नाही. ज्यांच्याकडे शेती आहे ते आपल्या शेतामध्येच अंत्यसंस्कार करीत असत. मात्र ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना अडचणीचा सामना करण्याची वेळ येत आहे.

सततच्या पावसामुळे होणारी अडचण पाहता गावकऱ्यांना आता स्मशानभूमीची आवश्यकता लक्षात आली आहे. या गावासाठी स्मशानभूमी शेड मंजूर झाले असून जागेचा वाद येथील न्यायालयात गेला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. गावात स्मशानभूमी शेड नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आसरा नसल्यामुळे नातेवाईकांना घरातच ठेवण्याची वेळ आली आहे. अखेर त्यांना आंबुलगा -बु येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागले. यापूर्वी ग्रामस्थांनी स्मशानभुमीबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यांचा प्रशासनाकडून उपयोग झाला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. पाऊस थांबत नसल्यामुळे अखेर हाणमंतवाडी येथील मृतदेहावर दुसऱ्या गावात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

निलंगा तालुक्यात ढगफुटी, अनेक गावांचा संपर्क तुटला !

तब्बल २३ तासानंतर अंत्यसंस्कार करावे लागले. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेतीबरोबर मृत झालेल्या व्यक्तीला व त्यांच्या नातेवाईकांना बसला आहे. याबाबत तहसीलदार गणेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या गावामध्ये स्मशानभुमी शेड मंजूर झाले असून येथील जागेचा वाद न्यायालयात गेला आहे. याबाबत स्मशानभुमीसाठी आजपर्यंत कोणीही लेखी अथवा तोंडी तक्रार केली नाही. मात्र न्यायालयाच्या आदेशाने लवकरच स्मशानभुमीचा प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी यावेळी सांगितले.


संपादन - गणेश पिटेकर