रस्त्यांवरील वाहतूक बंद; दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त, निलंगा तालुक्याला अतिवृष्टीचा फटका

Heavy Rain Blocked Roads In Nilanga
Heavy Rain Blocked Roads In Nilanga

निलंगा (जि.लातूर) : निलंगा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. तालुक्यातील पाच ठिकाणचे मुख्य रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत. या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्यामुळे दोन्ही बाजुंनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली. हा तालुका सीमावर्ती तालुका असल्यामुळे चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तालुक्याला बसला आहे.

संपूर्ण तालुक्यातील दहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच मांजरा व तेरणा या दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर लिंबाळा येथे तेरणा नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे निलंगा येथून कासारसिरशीमार्गे उमरग्याकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या दोन्ही बाजुंकडे निलंगा पोलिस ठाणे व कासारशिरशी पोलिस ठाण्यातील पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.शिवाय रामलिंग मुदगड येथून किल्लारीकडे जाणारा रस्ता ओढ्याला व नदीला पूर आल्यामुळे बंद झाला आहे.

मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत असल्यामुळे पाणी रस्त्यावर आल्याने बसव कल्याणकडे जाणारा रस्ता नेलवाड येथे बंद झाला आहे. निलंगावरून तुपडीमार्गे लातूर जाणारा रस्ता उमरगा येथे ओढ्याला पूर आल्यामुळे काही काळ बंद झाला आहे. शिवाय तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे नदीकाठी असलेल्या नदीहत्तरगा, कोकळगाववाडी, कोकळगाव, रामतीर्थ, मदनसुरी, जेवरी, सांगवी, बामणी, धानोरा, यलमवाडी, लिंबाळा, पिंपळवाडी, हाडोळी या नदीकाठची गावांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

शेतामध्ये काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या हजारो क्विंटलच्या गंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेरणा नदीवरील लिंबाळा बॅरेजमधून जास्त विसर्ग सुरू असल्याने हा रस्ता बंद झाला आहे. येथे तहसीलदार गणेश जाधव व गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी भेट दिली व दोन्ही बाजूने पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी खबरदारी घेतली आहे.

निलंगा शहराची पाण्याची चिंता मिटली
सध्या निलंगा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून निलंगा शहरास १०० टक्के अतिवृष्टी होत असल्यामुळे आज निलंगा शहरात नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी स्वतः नगरपालिकेच्या पथकासोबत विविध ठिकाणी पाहणी केली. शहरास पाणीपुरवठा होत असलेल्या माकणी (ता.लोहारा) येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात येत आहेत. पूर्वी ३८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने धरण पूर्ण भरले आहे. त्यामुळे निलंगा शहराची पाणीपुरवठ्याची चिंता संपली आहे.

निलंगा शहारातील तिन्ही ओढे, नाले ओसंडून वाहत असून पुलावरुन पाणी वाहत आहे. अशोकनगर येथील एका इसमास ओढ्यात वाहून जाताना नगरपरिषदेकडून वाचविण्यास यश आले असून नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. तसेच शहरातील महादेव गल्ली, मारवाडी गल्ली आदी अनेक जीर्ण घरांची पडझड झालेली आहे. त्यामुळे अशा स्थितीत जीवित वा वित्तहानी होऊ नये. याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी. आणखी ३ ते ४ दिवस मोठ्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निलंगा शहरातील समस्त नागरिकांना विनंती की, पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडून जाऊ नये.

पडझड होण्याची शक्यता असलेल्या घरांमुळे धोका होऊन नये याबाबत दक्षता घ्यावी. निलंगा नगरपरिषदेने विकसित केलेले अटलवॉकमध्ये व जिममध्ये पाणी घुसल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व पाऊस कमी होईपर्यंत बाहेर फिरणे टाळावे, असे अवाहन नगरपालिकेच्यावतीने करण्यात आले असून शहरातील नागरिकांना काही अडचण असल्यास नगर परिषदेच्या आपत्कालीन विभागाशी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. विकास पवार - ९८२२२८९२४५ व मुसा मुबारक - ९६६५०२७७६६ यांच्याशी संपर्क करावा असे अवाहन नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com