esakal | एसटी बंदमुळे विद्यार्थी व ग्रामीण प्रवाशी अवैध वाहतुकीकडे; जीव मुठीत घेऊन प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शाळा सुरु झाल्याने शिक्षणासाठी शहरात ये- जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच आहे. जवळपासच्या गावातही अनेक विद्यार्थी जा- ये करतात.

एसटी बंदमुळे विद्यार्थी व ग्रामीण प्रवाशी अवैध वाहतुकीकडे; जीव मुठीत घेऊन प्रवास

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जिल्हा परभणी) : लॉकडाऊन शिथील झाल्यावर एसटी महामंडळान शहरी भागासह लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु केल्या. परंतु ग्रामीण भागातील बस सेवा अद्यापही सुरु झाली नसल्याने खेड्यातील विद्यार्थी व प्रवासी जनतेची गैरसोय होत असल्याने त्यांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

शाळा सुरु झाल्याने शिक्षणासाठी शहरात ये- जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच आहे. जवळपासच्या गावातही अनेक विद्यार्थी जा- ये करतात. तसेच अनेक ग्रामस्थांना शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी कामाकरिता, बाजारहाट करण्यासाठी तालुक्याच्या व इतर ठिकाणी जाण्यासाठी शिवाय रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी हाल सोसावे लागत आहे. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. यामध्ये महिला व मुलींना खूप त्रास सहन करावा लागतो. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहे. एसटी बंद असल्याने बाहेरुन येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची, वर- वधू पक्षाकडील लोकांची प्रवासासाठी मोठी गैरसोय होत आहे. दूरवरुन येणाऱ्यांना खेड्यातील विवाह सोहळ्याकरिता वेळेवर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करुन प्रवास करावा लागतो तरी वेळेवर पोहोचण्याची खात्री नसते. 

वाहक, चालक 'बेस्ट' च्या सेवेत 

तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा बंद असल्याने तसेच मुंबईमधील स्थानिक रेल्वे बंद असल्याने जिंतूर आगारातील ४० वाहक, चालक थेट मुंबईत कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईत प्रवाशांसह वऱ्हाडी मंडळीची मोठी गैरसोय होत आहे. 

आगाराला रोज दीड लाखाचा फटका

जिंतूर आगाराच्या जवळपास पंधरा बसेस तालुक्यातील ग्रामीण भागात धावतात त्यातून महिन्याकाठी ४५ लाख रुपयांचे उत्पन्न आगाराला  होते. परंतु ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने आगाराला रोज सुमारे दीड लाखाचा फटका बसत आहे.

लवकरच मानव विकास अंतर्गत बससेवा सुरु होणार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे बससेवेअभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांची नेमणूक करून विद्यार्थ्यांना पासेस देण्याची प्रक्रिया सुरु असून मानव विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच बससेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सहायक वाहतूक अधीक्षक तथा प्रभारी आगारप्रमुख चिभडे यांनी दिली.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image