डफली आंदोलनाने दणाणला जिल्हाकचेरीचा परिसर, का आणि कुठे ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

हिंगोलीत संचारबंदीच्या विरोधात वंचितने डफली आंदोलन केले तर औंढा नागनाथ येथे भारिप बहुजन महासंघ व वंचित आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. फुटकळ व्यवसाय सुरू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.  

हिंगोली : कोरोनाने हातावर पोट असणाऱ्यांचे तर एक वेळची देखील चूल पेटने मुश्कील होऊन बसले आहे. गोरगरिबांचा अजिबात विचार न करता जिल्हाधिकारी जयवंशी यांनी १४ दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर डफली वाजवून आंदोलन केले. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही डफली वाजवत शासनाचा निषेध केला. शासनाविरुद्ध घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून सोडला होता. 

कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे. प्रत्येकाची रोजमजुरीवर गुजरान सुरू असून करण्यात आलेल्या लॉकडाउनमूळे त्यांचा रोजगार हा थांबला आहे. तर फुटकळ व्यवसायिक देखील लॉकडाउनमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वास्तविक पाहता संचारबंदीचा काळ कमी करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यापूर्वी देखील गांधी चौक येथे हात गाड्यावर चपल व जोडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तरी देखील प्रशासनाने लॉकडाउनचा कालावधी कमी केलेला नाही. ही परिस्थिती एकट्या हिंगोली जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात केलेल्या लॉकडाउनमुळे प्रत्येक जण अडचणीत सापडलेले आहे.

हेही वाचा - आगळावेगळा उपक्रम ; ‘डॉग हॅन्डलर्स’नी घेतले श्वान आरोग्याबाबत ऑनलाइन प्रशिक्षण... 

पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा
अगोदर तीन महिने केलेल्या लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात भर आता या परत करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे पडली आहे. त्यामुळेच ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन केले. हिंगोली येथील आंदोलनात रवी वाढे, वसिम देशमुख, ज्योतीपाल रणवीर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अन्यथा संचारबंदी मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वंचित आघाडीने दिला आहे.

हेही वाचा - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ‘वंचित’चे पदाधिकारी रस्त्यावर, कुठे ते वाचा...

औंढा नागनाथ येथे तहसीलदारांना निवेदन 
औंढा नागनाथ : भारिप बहुजन महासंघ व वंचित आघातर्फे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना बुधवारी (ता.१२) निवेदन देण्यात आले. भारिप व वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र व राज्य शासनाला राज्यातील एसटी महामंडळ सेवा तत्काळ सुरु करा व लॉकडाउन बंद करा अशी मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीकडे केंद्र व राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी डफली बजाव आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्या होते. त्याप्रमाणे औंढा नागनाथ येथे आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देऊन राज्यातील एसटी महामंडळ सेवा सुरु करा व लॉकडाउन बंद करा असे निवेदन दिले आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील एसटी महामंडळ सेवा सुरू करा राज्यातील लॉकडाउन बंद करा, कोरोना रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा द्या अशा मागण्या या निवेदनामध्ये आहेत. सदरील निवेदन हे औंढा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर भारिप व वंचित आघाडीचे बाळासाहेब साळवे, रामराव मुळे, अरविंद मुळे, सुनील मोरे, मुकुंद मस्के, राजू कांबळे, अक्षय वाहुळे कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Duffy agitation ravaged the district premises, read why and where ..., Hingoli News