कोरोनाच्या सावटाखाली दसरा, परंतू सिमोलंघन नाही 

गणेश पांडे 
Sunday, 25 October 2020

विजयादशमीचा सण रविवारी (ता.२५) परभणी शहर व परिसरात उत्साहाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मुहुर्ताचे औचित्य साधत प्रमुख बाजारपेठांतही खरेदी उत्सवाला उधाण आले होते. 

परभणी ः विजयादशमीचा सण रविवारी (ता.२५) परभणी शहर व परिसरात उत्साहाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मुहुर्ताचे औचित्य साधत प्रमुख बाजारपेठांतही खरेदी उत्सवाला उधाण आले होते. अनेक नवीन उपक्रमांचे शुभारंभही करण्यात आले. 

कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दसरा सण आल्याने यंदा सिमोलंघनासाठी लोकांना जाता आले नाही. ऐरवी पोलिस अधिक्षक कार्यालय व स्टेडीयम परिसरात सिमोलघंन होत असे. परंतू, यंदा दसरा सणानिमित्य जमणारी गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या घरी बसूनच दसरा सण साजरा करावा लागला. 

पुरोहितांच्या मदतीने पूजन
सायंकाळी प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या घराच्या बाहेर किंवा गल्लीतील मोकळ्या जागेत आपट्याच्या व शमीच्या पानांची पारंपरिक पद्धतीने परभणीकरांनी पुरोहितांच्या मदतीने पूजन केले. सकाळी शहरातील मिठायांच्या दुकानातून गर्दी होती, सणामुळे मिठायांच्या दरातही वाढ झाली. गिफ्ट बॉक्सलाही चांगली मागणी होती. मुहुर्तामुळे बाजारपेठेतूनही खरेदीसाठी गर्दी होती. अनेक नव्या दालनांची, फर्मची, उपक्रमांची सुरुवात आजपासून करण्यात आली. सकाळपासून प्रत्येक जण आप - आपल्या आप्त स्वकियांना मोबाईलवरून शुभेच्छा देत होता. त्यासाठी सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. 

खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी 
कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या अनेक दिवसांपासून घराच्या बाहेर न पडलेले अनेक नागरीक आज दसऱ्याच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गाड्या व सराफी बाजारात लोकांची मोठी गर्दी दिसून आली. सकाळपासून महापालिका व पोलिसांच्यावतीने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवाहन केले जात होते. त्यामुळे गर्दीवर बऱ्या पैकी वचक राहीला असल्याचे दिसून आले. 

हेही वाचा - हिंगोली : दसऱ्यांच्या मुहूर्तावर बाजारात विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

सराफा बाजारात मंदीच 
दरवर्षी दसऱ्याला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. परंतू यंदा कोरोनाचा फटका सराफा बाजाराला देखील बसला असल्याचे दिसून आले. ऐरवी सराफा बाजारात एकट्या दसऱ्याला कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे सराफा व्यापारी आनंदी असतात. परंतू यंदा कोरोना विषाणु संसर्गामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका आता ही जाणवला. दसऱ्याला म्हणावे तशी सोने खरेदी झाली नसल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा - नांदेड : सचखंड गुरुव्दावाराचा हल्लाबोल संपन्न

ईलेक्ट्रॉनिक्स साहित्याचीही खरेदी नाही 
दसऱ्याच्या दिवशी घरात चांगली वस्तू देखील घेतली जाते. परंतू, यंदा शहरातील इलेट्रॉनिक्स वस्तूच्या दुकांनाकडे ही ग्राहकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून आले. या बाजारात ही म्हणावी तशी खरेदी झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dussehra under the coronation, but not a semblance, Parbhani News