esakal | आठही सेतू सुविधा केंद्रे बंद
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची हेळसांड 

आठही सेतू सुविधा केंद्रे बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद ः जिल्ह्यातील तालुका मुख्यालयी असलेली आठही सेतू सुविधा केंद्रे बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची विविध प्रमाणपत्रांसाठी हेळसांड होत आहे. दरम्यान, संबंधित सेतू सुविधा केंद्रांचा करार संपल्यामुळे ती बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ऐनवेळी महसूल प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे.


जिल्ह्यात उस्मानाबादसह आठही तालुका ठिकाणी तहसील कार्यालयाच्या परिसरात ही सेतू सुविधा केंद्रे सुरू होती. आवश्‍यक प्रमाणपत्रे नागरिकांना या केंद्रातून मिळत होती. त्यासाठीचे कंत्राट लातूर येथील रुद्राणी इन्फोटेक लिमिटेडला देण्यात आले होते. त्याची मुदत संपल्यानंतर 31 जुलैपर्यंत अटी व शर्तींच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, दहावी व बारावीचे निकाल लक्षात घेता जात, उत्पन्न, नॉन क्रिमीलेअर अशा शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता या केंद्रांना एक ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

31 ऑगस्ट रोजी मुदत संपल्यानंतर ही केंद्रे बंद करण्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आल्यामुळे ही केंद्र सध्या बंद आहेत. त्यामुळे मंगळवारी (ता. तीन) सेतू सुविधा केंद्रांत विविध प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांची हेळसांड झाली. 
दरम्यान, जिल्ह्यात असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रातून अशी प्रमाणपत्रे मिळण्याची सुविधा असल्याचे आता महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, आपले सरकार केंद्र किंवा महा-ई सेवा केंद्रात प्रमाणपत्रांसाठीचे दर निश्‍चित नसल्याचे नागरिक सांगतात. सेतू सुविधा केंद्रामधून लोकांची कामे व्हायची. त्यामुळे दलालांना चाप बसला होता. बाहेरून ऑनलाइन अशा कामांसाठी अधिकचे पैसे द्यावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. कमी दरामध्ये सेतू सुविधा केंद्रातूनच ही प्रमाणपत्रे मिळतात. त्यामुळे ही केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. सेतू सुविधा केंद्रांच्या कंत्राटाची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच निविदा काढून त्याते वेळेपूर्वी कंत्राट देणे आवश्‍यक होते; परंतु महसूल प्रशासनाकडून याला विलंब का करण्यात आला, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सेतू सुविधा केंद्रे ही जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सुरू होती. त्यामुळे परिसरात नागरिकांची वर्दळ होती. त्यामुळे महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ही केंद्रे कार्यालयापासून अन्यत्र असावीत, यासाठीच बंद केल्याची चर्चा आहे. 

सेतू सुविधा केंद्राचे नाव बदलले आहे. मुदत संपल्यामुळे त्याबाबत निविदा काढण्यात आली असून, येत्या महिनाभरात ही निविदा अंतिम करण्यात येईल. तोपर्यंत प्रमाणपत्रांसाठी जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्रातून नागरिकांना प्रमाणपत्रे काढता येतील. 
- राजेंद्र खंदारे, निवासी उपजिल्हाधिकारी 

loading image
go to top