फक्त मुंडे स्मारकासाठीच फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले : खडसे

प्रा. प्रविण फुटके
Thursday, 12 December 2019

आपण मंत्री असताना औरंगाबाद येथील दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन विभागाची जागा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी दिली होती. परंतु, नंतर पाच वर्षांच्या काळात स्मारक उभारले नसल्याचा आरोप यापूर्वीही आणि आजही एकनाथ खडसे यांनी केला.

परळी (जि. बीड) : देवेंद्र फडणवीस यांनी भल्या पहाटे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि तिसऱ्या दिवशी त्यांना राजीनामाही द्यावा लागला. याबाबत पक्षांतर्गत आणि विरोधकांच्या टीकेचे धनी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे कारण भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. फडणवीस केवळ लोकनेते गोपीनाथरा मुंडे यांच्या स्मारकासाठीच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याचे त्यांनी सांगितले.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी आपण मंत्री असताना दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन विभागाची जागा दिली होती. त्यांच्या नावाने अपघात विमा योजनाही आपल्याच आग्रहाने कॅबीनेटमध्ये मंजूर झाली. मात्र, आपण मंत्रीपदावरुन गेल्यानंतर भाजप सरकारकडून स्मारकासाठी काहीच झाले नाही अशी थेट टीका त्यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. या स्मारकासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

खडसे आणखी काय म्हणाले, क्लिक करा आणि वाचा 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा ता. २३ नोव्हेंबरला मुख्यमंत्री झाले. ता. २४ नोव्हेंबरला त्यांनी जागेच्या एक्सेप्टन्सवर स्वाक्षरी केली आणि ता. २५ नोव्हेंबरला स्मारकाचे कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर पुन्हा ता. २६ नोव्हेंबरला फडणवीस यांनी राजीनामा दिल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. त्यामुळे फडणवीसांनी एवढे करुनही या एका कामासाठी ते दुसऱ्यांदा आले, असा टोला लगावत त्यासाठी त्यांचे आभार मानतो, असेही एकनाथ खडसे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse's Satire comment on Devendra Fadanvis in Parli