पाटील- शिंदे भेटीमागं दडलंय काय?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 August 2019

- एकनाथ शिंदेनी घेतली विनोद पाटलांची धावती भेट 
- दानवेंना मदत करण्याची घातली गळ

औरंगाबादः मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन धावती भेट घेतली. शिंदे महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी औरंगाबादेत आले होते. मुंबईला परत जातांना त्यांनी काही मिनिटांसाठी विनोद पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. अंबादास दानवे यांना निवडणुकीत मदत करा अशी विनंती शिंदे यांनी आपल्याला केल्याचे विनोद पाटील यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर या विरोधात सर्वोच्च न्यायालयात स्थगितीसाठी अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. परंतु सुप्रीम कोर्टानी मराठा आरक्षणाच्या निर्णयास स्थिगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळत उच्च न्यायलयाचा निकाल कायम ठेवला होता. मराठा आरक्षणाचा लढा जिंकल्यानंतर विनोद पाटील यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीसाठी एकनाथ शिंदे यांनीच पुढाकार घेतला होता असे देखील बोलले जाते. 

या भेटीनंतरच औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना विनोद पाटील यांना उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु पाटील यांनी थेट शिवसेनेकडून निवडणूक न लढता आपल्याला युतीने पुरस्कृत करावे अशी मागणी केली होती असे बोलले जाते. उध्दव ठाकरे यांना मात्र याला स्पष्टपणे नकार दिला होता. 

त्यानंतर पाटील यांनी दिल्ली आणि मुंबईत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना देखील आपल्याला पुरस्कृत करण्याची मागणी केल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण आघाडीने देखील त्यास असमर्थता दर्शवली होती. दरम्यान, विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतिम स्पष्टता मिळत नाही, तोपर्यंत आपण निवडणूक लढवणार नाही असे स्पष्ट केले होते. 

दानवेंना मदत करण्याची घातली गळ 
एकनाथ शिंदे आज औरंगाबादेत होते. अंबादास दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चिकलठाणा विमानतळावर जातांना त्यांनी विनोद पाटील यांच्या निवासस्थानी धावती भेट दिली. यावेळी युवासेनेचे राजेंद्र जंजाळ हे देखील होते. अगदी दहा मिनिटांच्या या भेटीत शिंदे यांनी विनोद पाटील यांना अंबादास दानवेंना पाठिंबा आणि मदत करण्याची गळ घातली. 

या संदर्भात विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, एकनाथ शिंदे माझ्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांना मदत करण्यास मला सांगितले. पंरतु आपण कुठलीही निवडणूक लढवणार नसल्याचे व सध्या राजकारणात पडणार नसल्याचे सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Shinde meets vinod patil in Aurangabad