महावितरणमुळे ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा, लातुरात विजेचा लपंडाव

विकास गाढवे
Sunday, 4 October 2020

लातुरात विजेचा लंपडाव सुरु आहे.

लातूर : महावितरणच्या शहरातील व्यवस्थेत शिवाजी चौक ते गांधी चौकासाठी शेवटचे सेक्शन (युनिट) आहे. युनिटच्या कार्यक्षेत्रात काहीच बिघाड नसताना त्याअगोदरच्या तीन युनिटमध्ये सातत्याने होत असलेल्या बिघाडाचा त्रास शेवटच्या युनिटला सोसावा लागत आहे. दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडत आहे.

‘कृषी’च्या नियुक्त्या; महसूल मागवतेय मागदर्शन, तलाठी नियुक्त्यांचा प्रश्न

एमआयडीसीतील महावितरणच्या जुन्या वीज उपकेंद्रांपासून गांधी चौकापर्यंत स्वतंत्र फिडर (वाहिनी) आहे. या फिडरचे ‘शिवाजी’ नाव असून, त्यावरून चार युनिटला विजेचा पुरवठा होतो. यात तीन, नऊ, सात व दहा या युनिटचा समावेश आहे. शेवटचे दहा क्रमांकांचे युनिट असून, त्या अंतर्गत शिवाजी चौकापासून व गांधी चौकापर्यंतचा मुख्य रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग येतो. या भागात वीज यंत्रणा चांगली आहे.

मात्र, युनिटपूर्वी येत असलेल्या तीन युनिटमध्ये काही बिघाड झाला की त्याचा फटका शेवटच्या युनिटमधील भागाला बसतो. पूर्वीच्या युनिटमधील भागात झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी वीज पुरवठा खंडित केला जातो. यासोबत वीज उपकेंद्रांतील इन्कमरच्या यंत्रणेतही समस्या आहे. उपकेंद्रांतून अनेक फिडर जातात.

एकानंतर एक फिडरचा वीज पुरवठा बंद (ट्र्रीप) होतो. तो पुन्हा सुरू होण्यासाठी पाच मिनिटे लागतात. यामुळे फिडरवरील भागात विजेचा लपंडाव सुरू असून, तो काही केल्या बंद होत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेत शेवटच्या नळाला कमी पाणी तर कधी हवा, असा अनुभव येतो. विजेबाबतही अगदी तसाच प्रकार सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले.

घरी राहून कोरोनाशी लढा देणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली, लातूरातील चित्र !

कोयनाचा थोडा आधार
शेवटचे युनिट म्हणून शिवाजी चौक ते गांधी चौक परिसरात सुरू असलेला विजेचा त्रास कमी करण्यासाठी महावितरणने कोयना वीज उपकेंद्रात शिल्लक असलेला लोड या भागात आणला आहे. यामुळे महापालिका ते गांधी चौक परिसरातील वीजेचा लपंडाव थांबला आहे. उर्वरित भागात विजेची बोलती दिवसभर सातत्याने बंद होत आहे. यासाठी आर्वी उपकेंद्रांतून वीज पुरवठा घेऊन पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबत एमआयडीसी उपकेंद्रांतील इन्कमर (ट्रीप होणारी) यंत्रणा दुरुस्त करण्याबाबत पत्र दिले आहे. या भागात सुरळीत वीज पुरवठ्याचे अखंडित प्रयत्न सुरू असल्याचे युनिट दहाचे सहायक अभियंता राम चिगुरे यांनी सांगितले.

 

तीन महिन्यांपासून सतत अखंडित वीज पुरवठा सुरू आहे. दिवसभर वीज बंद चालू होत असल्याने विद्युत उपकरणे निकामी होण्यासह अनेक अडचणी येत आहेत. त्याचा सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणावर मोठा परिणाम झाला असून कोणत्या वेळी वीज जाईल, याचा नेम नाही. वीज जाण्याची एक ना अनेक कारणे ऐकून कंटाळलो आहोत.
- जितेंद्र कंडारकर, पालक.

 

संपादन - गणेश पिटेकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity Seek And Hide Game In Latur