
जिल्ह्यात हॉटस्पॉट असलेल्या गावांत कळमनुरी तालुक्यातील बाभळी, मसोड, औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव, गोळेगाव, पुरजळ, साळणा, येहळेगाव सोळंके, हिंगोली तालुक्यातील चिंचोली निळोबा, खानापूर चिता, वसमत तालुक्यातील हयातनगर, नहाद या गावांचा समावेश आहे.
हिंगोली : जिल्ह्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर यासह इतर जिल्ह्यातून अनेक जण येत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील ११ गावात रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने ही गावे हॉटस्पॉट ठरली असून नियमित सर्वेक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यात पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी जिल्ह्यातून येणारे गावकरी कोरोनाबाधित आढळत आहेत. सदर रुग्ण आरोग्य सेतू ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत.
हेही वाचा - चार लाख क्विंटल कापसाची खरेदी -
संशयित व्यक्तींना क्वारंटाइन करावे
त्यामुळे जिल्ह्यात ११ हॉटस्पॉट गावांत कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सदर गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन करावे, नियमित सर्वेक्षण सुरू ठेवावे, कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास संबधित व्यक्तींना त्वरीत संदर्भीत करण्याच्या सूचना डॉ. श्रीवास व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांच्या वैद्यकिय अधीक्षकांसह तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नियमित सर्वेक्षण सुरू ठेवावे
जिल्ह्यात हॉटस्पॉट असलेल्या गावांत कळमनुरी तालुक्यातील बाभळी, मसोड, औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव, गोळेगाव, पुरजळ, साळणा, येहळेगाव सोळंके, हिंगोली तालुक्यातील चिंचोली निळोबा, खानापूर चिता, वसमत तालुक्यातील हयातनगर, नहाद या गावांचा समावेश आहे. येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन करावे, नियमित सर्वेक्षण सुरू ठेवावे, अशा सूचना डॉ. श्रीवास यांनी दिल्या आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पोचली २३७ वर
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २३७ झाली असून त्यापैकी २०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यांतर्गत आयसोलेशन वार्ड व जिल्ह्यातल सर्व कोरोना केअर सेंटर व गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटरअंतर्गत एकूण तीन हजार ८७६ संशयितांना भरती करण्यात आले आहे.
येथे क्लिक करा - आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट -
सध्या ६५२ संशयित भरती
त्यापैकी तीन हजार ४३६ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तीन हजार २०२ जणांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. सध्या ६५२ संशयित भरती आहेत. तर २३० संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा
जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश दुकाने सुरू झाली आहेत. मात्र, लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच नागरिक मोठ्या संख्येंने बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.