अतिक्रमण पथकावर उगारले दगड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - सिडको बसस्थानकासमोरील हरितपट्ट्यातील अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकावर बांधकामाचे साहित्य उचलल्यावरून विकासकाच्या साथीदारांनी दगड उगारले. एकीकडे महापालिकेचे कर्मचारी अतिक्रमित साहित्य जप्त करत होते. दुसरीकडे विकासक तेच साहित्य महापालिकेच्या वाहनातून परत काढून फेकत होते. हा प्रकार रविवारी (ता. २५) दुपारी घडला. सरकारी कामात अडथळा आणून धमकावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सारस्वत बॅंक आणि विंडसर कॅसलच्या मधोमध सीए सोमेश वसावा यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. जळगाव रस्त्याकडेला असलेल्या हरितपट्ट्यावर त्यांनी बांधकामाचे साहित्य सहा महिन्यांपासून टाकले आहे. पत्र्याचे शेड करून सिमेंट पोती, सळई, वाळू, बांधकामावेळी निघालेला मुरूम टाकला आहे. याबाबत महापालिकेकडून एकदा दंडही आकारण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिकेने प्रसारमाध्यमातून जाहीर प्रकटन आणि संबंधितांना नोटीस देत रविवारी सकाळी हर्सूल ते सिडकोतील वसंतराव नाईक चौकापर्यंतचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई हाती घेतली. त्यानुसार हरितपट्ट्यातील पत्र्याचे शेड तोडत सिमेंटची पोती जेसीबीने भरायला सुरू केली. विकासकाच्या साथीदारांनी काम थांबवण्यासाठी अरेरावी केली. एकाने तर जेसीबी चालकावर भलामोठा दगड उगारला. विशेष म्हणजे पत्र्याच्या शेडमध्ये जवळपास दोन पोती देशी दारूच्या बाटल्यांचा खच आढळला.

कारवाई थांबवण्यासाठी बांधकामावरील लोक तसेच बॉडी बिल्डर महापालिका कर्मचाऱ्यांना धमकावत होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करीत त्यांना रोखले. विकासकाने साहित्य इतरत्र हलविण्यासाठी दीड तासांची मुदत मागितली. रात्र होईपर्यंत त्यांचे काम सुरूच होते.

वसावा, खरात यांच्यावर गुन्हा
घटना घडल्यानंतर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी गुन्हा दाखल करायला गेले; मात्र तीन तास त्यांना ताटकळत ठेवण्यात आले. पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्तक्षेपानंतर सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमेश वसावा आणि सोमिनाथ खरात यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यानंतर नोटीस द्यायची गरज नसते. तरीही हरितपट्ट्यातील अतिक्रमण हटवण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांनी संबंधिताना नोटिस पाठवली होती. सरकारी कामात अडथळा आणलेल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमण हटवून झाडे लावायची आहेत.
- मंजूषा मुथा, उपायुक्‍त, महापालिका.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment Crime Disturbance