हवेतील सापेक्ष आद्रता व तापमानाच्या नोंदीत फरक ! शेतकऱ्यांची पुणे कृषी आयुक्तांकडे तक्रार

राजेश दारव्हेकर
Saturday, 21 November 2020

हवामान आधारित फळ पिकविमा योजनेतंर्गत सन २०२०-२१ मध्ये कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील केळी उत्पादक शेतकऱ्याने फळ पिकविमा भरणा केला होता. परंतु सदरील लाभार्थ्यांना पिक विम्याचा लाभ मिळाला नसल्याने त्यांनी अनेक वेळा लाभ मिळावा, अशी मागणी करून देखील विमा दिला जात नव्हता.

हिंगोली : हवामान आधारित फळ पिकविमा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विम्याचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार केल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने वडगाव  येथील हवामान केंद्रास भेट देऊन पाहणी केली. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्याने या संदर्भात जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांनी पुणे कृषी आयुक्तालयातील आयुक्तांना अहवाल पाठविला आहे.

हवामान आधारित फळ पिकविमा योजनेतंर्गत सन २०२०-२१ मध्ये कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील केळी उत्पादक शेतकऱ्याने फळ पिकविमा भरणा केला होता. परंतु सदरील लाभार्थ्यांना पिक विम्याचा लाभ मिळाला नसल्याने त्यांनी अनेक वेळा लाभ मिळावा, अशी मागणी करून देखील विमा दिला जात नव्हता. त्यामुळे २७ ऑक्टोबरला संबंधित लाभार्थ्यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन त्यासंदर्भात तयार केली होती. 

हे ही वाचा : विजेचा शॉक लागून शेतकरी मुलाचा मृत्यू

या अनुषंगाने पाच नोव्हेंबर रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे व पथक प्रमुख उपविभागीय कृषी अधिकारी बी.एस. कच्छवे, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे हवामान शास्त्रज्ञ के.के.डाखुरे, कळमनुरी तालुका कृषी अधिकारी यांनी स्वयंचलित हवामान केंद्राच्या प्रतिनिधींनी कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील हवामान केंद्रास भेट देऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी अनेक त्रुटी आढळून आल्या. यामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र (ऑटोमीक वॉटर स्टेशन) स्कायमेट कंपनीने तांत्रिक दृष्ट्या योग्य स्थळी स्थापित केलेले दिसून आले नाही.

हवामान आधारित स्वयंचलित केंद्राभोवती अडचणी आहेत. ज्यामध्ये जुनी शाळेची इमारत, झाडे झुडपे व नवीन शाळेची इमारत आदी. हवामानावर आधारीत स्वयंचलित केंद्र स्थापित करतेवेळी कंपनीने हे टाळणे आवश्यक असताना ते केले नाही. त्यामुळे हवेतील सापेक्ष आद्रता व तापमानाच्या नोंदीमध्ये फरक पडू शकतो, अशा त्रुटी आढळून आल्या आहेत. तसेच लगतच्या वसमत तालुक्यातील गिरगाव मंडळ येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फळ पिकविमा मंजूर झाला आहे.

तापमान साक्षेप आद्रतेतील नोंदीमधील थोड्याशा फरकामधील फळ पिकविमा योग्य नसून संबंधित शेतकऱ्यांना फळ पिकविमा मंजूर करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुणे कृषी आयुक्तालयचे आयुक्त यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालावर विद्यापीठात काय निर्णय घेईल, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Errors have been found in the weather based fruit crop insurance center