फोटो
फोटो

नांदेडात असाही विवाह, होणारा खर्च बालगृहाला  

नांदेड :  पाटनूर (ता. अर्धापूर) येथील परमेश्वर काळे आणि बारड येथील शीतल कल्याणकर या नवदाम्पत्याने नोंदणी पद्धतीने विवाह केला. लग्नासाठी खर्च होणारी रक्कम नांदेड येथील सुमन बालगृहाला दिली. कर्ज काढून थाटात लग्न करणाऱ्यांसाठी या स्तुत्य उपक्रमामुळे एक नवीन पायंडा पडला आहे. लग्नावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाला फाटा देण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे. हा पायंडा पुढे पडला, तर त्यातून एक वेगळा आदर्श समाजापुढे येणार आहे. 


पाटनुर येथील परमेश्वर रामराव काळे आणि बारड येथील शीतल नागोराव कल्याणकर या दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाह समारंभात खर्च होणारी रक्कम सुमन बालगृहाचे अनिल दिनकर आणि विठ्ठल दिनकर यांना सुपूर्द केली आहे. आपल्याकडे लग्नाला प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होतो. हुंडा, मानपान, आहेर, प्रशस्त मंगल कार्यालय या सर्वांचा खर्च भरमसाट वाढलेला आहे. त्याचबरोबर रुढी, परंपरा, प्रतिष्ठा, पाहुणे यांचा सन्मान केला जातो, अशा पद्धतीने हे लग्नसोहळे होतात. हे सर्व करत असताना वधू- वरांच्या आई- वडिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात अनेकांचे रुसवे- फुगवे आलेच. अशा विवाहातून यापैकी कुठलेही प्रसंग येणार नाहीत. परमेश्वर आणि शीतलच्या लग्नात ना हुंडा घेतला गेला, ना नवीन कपडे, ना अक्षदा, ना फेरे होते. 

परमेश्वर सध्या नाशिक येथे अभियंता

परमेश्वर काळे हा बाबा आमटेंच्या विचारांशी संबंधित असलेला डाव्या विचार सरणीचा युवक आहे. महात्मा गांधी, भगतसिंग यांच्या विचारांवर चालणारा तरुण आहे. बाबा आमटेंच्या सोमनाथ येथील शिबिरात त्यांनी अनेक वेळा सहभाग घेतला होता. परमेश्वर सध्या नाशिक येथे अभियंता आहे आणि शीतलने आर्टस्‌मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. परमेश्वरने नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची कल्पना आपल्या आई-वडिलांना सांगितली. त्यांनी मान्यता दिली. शीतलच्या आई-वडिलांनी या विवाहाला प्रतिसाद देऊन विवाह संपन्न झाला. 

खर्चाचा धनादेश सुमनगृहाला

विवाह झाल्यावर बारड येथे स्वागत समारंभात दोन्ही कुटुंबाच्या नातेवाईकांना एकत्रित करण्यात आले होते. या छोटेखानी कार्यक्रमात परमेश्वर आणि शीतल या दोघांनी लग्नाचा खर्च टाळून ती रक्कम धनादेशाद्वारे सुमनगृहाला दिली. परमेश्वर आणि शीतलने यांचा आदर्श अनेक तरुणांनी घेतला; तर लग्नाच्या माध्यमातून निर्माण होणारे प्रश्न कायमचे सुटतील. आपल्याकडे सामूहिक विवाह पद्धत आहे; पण त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. रुढी परंपरा, प्रतिष्ठा जपण्यात लोकांचा अधिक कल असतो. हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे. परमेश्वर आणि शीतलने घेतलेला निर्णय सर्व तरुणाईसाठी महत्त्वपूर्ण पायंडा मानला जातो. त्या दोघांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. 

छोटेखानी घरगुती जो स्वागत समारंभ

मला रुढी- परंपरा मान्य होण्याचे काही कारणच नाही. कोणत्याही कार्यात पैसा खर्च करणे आणि कोणतेही समाधान न मिळता, खोट्या प्रतिष्ठेसाठी मिरवत राहणे मला आवडत नाही. लग्नात खर्च करणार नाही, हे पूर्वीपासूनच ठरवलं होतं. मी छोटेखानी घरगुती जो स्वागत समारंभ केला होता, तोही मला नको होता; पण काही नातेवाईकांच्या आग्रहाखातर तो करावा लागला. तो फक्त दोन कुटुंबांसाठीच होता. माझ्या लग्नाची दखल घेऊन कोणी लग्न असेच करील का? यातून लग्नाचा खर्च कमी होईल का? हे मला माहीत नाही; पण मला वाटते की, मी सुरुवात केली आहे. ज्या तरुणांना लग्न करायचे आहे त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न करावे, यातून एक नवीन पायंडा पडल्याशिवाय राहणार नाही. 
परमेश्वर काळे, (नवरदेव) 

समाजात एक चांगला संदेश 

परमेश्वर काळे हा पुरोगामी विचारात वाढलेला तरुण आहे. बाबा आमटेंच्या श्रमशिबिर छावणीतून तो घडला आहे. लग्न, त्यातून होणारा खर्च, कर्मकांड तो मानणारा नव्हताच, हे अगदी खरं होतं. तो आपल्या निर्णयाचा पक्का आहे. त्याने आधीच ठरवलं होतं की, मी लग्नावर खर्च करणार नाही, अगदी तसंच झालं आहे. लग्नासाठी जो काही खर्च लागणार होता, तो त्यांनी सुमन बालगृहाला दिला आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. या निमित्ताने एक चांगला संदेश समाजात जात आहे. हा विचार तरुणांनी करायला हवा; तसेच या प्रकारचे विवाह समाजात व्हायला हवेत. असे अनेक विवाह आम्ही घडवून आणले आहेत. 
प्रा. राजाराम वट्टमवार, ज्येष्ठ समाजसेवक) 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com