गठ्ठ्यात मते झाकली पण बीड भाजपची ताकद कळून चुकली, नेत्यांनीही लक्ष देण्याची गरज

दत्ता देशमुख
Sunday, 6 December 2020

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव झाला. यात त्यांच्या मतांत आणि पराभवात बीड भाजपचा जो काही वाटा होता तो मराठवाड्याच्या गठ्ठ्यात झाकून गेला असला तरी हळुहळु बीड भाजपची ताकद विरोधकांना कळून चुकली आहे.

बीड : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव झाला. यात त्यांच्या मतांत आणि पराभवात बीड भाजपचा जो काही वाटा होता तो मराठवाड्याच्या गठ्ठ्यात झाकून गेला असला तरी हळुहळु बीड भाजपची ताकद विरोधकांना कळून चुकली आहे. त्यामुळे अशीच वाटचाल राहीली तर जनताही पोथी ओळखून सोडील हे आताच ध्यानात घ्यायला हरकत नाही.

फक्त नेत्यांच्या मागे पुढे केले कि आपले सगळे ‘झाकून’ जाते असा समज असणाऱ्यांची संख्या भाजपमध्ये अधिक असून त्यांना ग्राऊंड रिॲलिटीचे काहीही देणेघेणे आणि ग्राऊंडशी संबंध नसणाऱ्यांनाच नेत्यांजवळ अधिक वेळ आणि जवळची जागा असल्याचेही अलिकडे दिसत आहे. नेत्यांनीही आता अधिक लक्ष घालून कार्यकर्त्यांची पारख करण्याबरोबरच पक्षाची बांधणी करण्यासाठी वेळ दिला तरच भाजपला पुन्हा ‘अच्छे दिन’ येतील. अन्यथा कानाजवळ घोषणांचा गजर आणि निकालात सफाई असेच चित्र पुढेही राहील यात शंका नाही.

२०१४ ला लोकसभेची पोटनिवडणुक आणि विधानसभेची पोटनिवडणुक सोबत झाली. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची सहानुभूती आणि मोदी लाटेत कमळ असे फुलले कि विरोधकांचेही डोळे विस्फारुन गेले. पण, तेव्हा जे काही कार्यकर्त्यांच्या डोक्यात हवा शिरली ती पराभवांची मालिका सुरु असतानाही उतरायला तयार नाही. पाच आमदार, एक खासदार आणि पालकमंत्रीपद असताना जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे पानीपत झाल्याचेही सत्तेमुळे लक्षात आले नाही. पुन्हा लोकसभेला मोठा विजय झाल्याने हवा कायम राहीली पण विधानसभेला पुन्हा पानीपत झाले.

जिल्हा परिषदेचीही सत्ता हातची गेली. मात्र, चिंतन, बांधणी, आखणी याकडे साफ दुर्लक्ष झाले. लोकमंतांची ॲलर्जी असणाऱ्यांनी सत्ताकाळात कानाजवळ घोषणा देत नेत्यांना कोंडाळ्यातून बाहेर येऊ दिले नाही. आताही या मंडळींचे तेच सुरु आहे. त्यामुळे निवडुण येण्याची आणि आणण्याची क्षमता असणाऱ्यांना मात्र लवकर जागा मिळत नाही. परिणामी भाजपची ताकद वरचेवर घटत आहे. विधानसभा निवडणुका होऊन वर्षे लोटले आहे. पण, नव्याने बांधणीचे नाव नाही. आता बोराळकरांना पडलेल्या एकूण मतांत निम्म्याहून अधिक मते बीडची असा दावा करुनही प्रतिवाद केला जाऊ शकतो. मात्र, आपली ताकद नेमकी किती हे जनमताचा आरसा पाहून ओळखून बांधणी केली तरच पुढची वाटचाल सोयीची होईल. अन्यथा मागच्या प्रमाणेच नगर पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या निकालांचे पाढे पुढे सुरु राहतील.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Should Consatrate Organisation Structure Of Beed