esakal | हिंगोलीच्या कोविड रुग्णालय परिसरात फिरणे पडले महागात; ३५ नातेवाईक विलगीकरण कक्षात

बोलून बातमी शोधा

हिंगोली कोवीड सेंटर

हिंगोलीच्या कोविड रुग्णालय परिसरात फिरणे पडले महागात; ३५ नातेवाईक विलगीकरण कक्षात

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : येथील जिल्हा शासकीय कोविड सेंटर मध्ये मंगळवारी (ता. २७) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी अचानक भेट दिली असता येथे रुग्णांचे ३५ नातेवाईक आढळून आले. त्या सर्वांची चौकशी करुन त्याना लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात रवाना करण्यात आले आहे.

येथील शासकिय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना सोयी सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन पुढाकार घेत आहे. परंतु रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक कोविड केंद्रात थांबत आहेत. त्यातील काही जण दिवसभर शहरात फिरुन परत येथे जात आहेत. दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख आदींनी येथे भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल डोंगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - काळजी घ्या पण काळजी करु नका असा रुग्ण, नातेवाईकांना जिव्हाळ्याचा सल्ला देतानाच येत्या दहा दिवसांत अख्या महाराष्ट्रातून कोरोना विषाणू हद्दपार होणार

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी येथे फिरुन रुग्णांची चौकशी केली. त्यांना आरोग्य सुविधा मिळतात काय, नाश्ता, भोजन वेळेत मिळते काय याची माहिती घेतली. त्यानंतर या ठिकाणी थांबलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची त्यांनी हजेरी घेत त्यांची खरडपट्टी केली. त्यानंतर या ठिकाणी रुग्णवाहिका बोलावून ३५ जणांना लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात रवाना करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांना काही दिवस थांबवून त्यानंतरच घरी सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच येथे आरोग्य सुविधेसाठी तीस आरोग्य कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. रुग्णांचे नातेवाईक येथे येऊ नये यासाठी पोलिस अधिक्षक कलासागर यांनी वाढीव बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे