उडीदाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळतोय; उमरगा, मुरुम बाजार समितीत आवक सुरु

अविनाश काळे
Thursday, 24 September 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, मुरुम बाजार समितीत उडीदाला चांगला भाव मिळत आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : यंदाचा पावसामुळे उडीद, मूगाची नासाडी झाली. राज्य सरकारने हमीभाव जाहीर करून ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले असले तरी सद्यःस्थितीत कृषी बाजार समितीत अडत व्यापारी खरेदीत चांगल्या दर्जाच्या मालाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. मात्र आवक फार मोठ्या प्रमाणात नसल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना वाढीव भावाचा फायदा होत आहे.

उमरगा आरटीई प्रवेश : प्रतिक्षा यादीतील ४८ जणांना संधी 

दरम्यान पावसात नुकसान झालेल्या सोयाबीनची काढणी प्रक्रिया सुरू असून काही मोजक्या ठिकाणी झालेल्या राशीमुळे अडत बाजारात सोयाबीन आले आहे, मात्र भाव कमी मिळत आहे. तालुक्यातील एकुण शेतजमिनीच्या तुलनेत खरीप हंगामाचे क्षेत्र अधिक असते. यंदा पावसाच्या अनियमिततेचा फटका खरीप पिकाला बसला आहे. ऐन काढणीच्या अवस्थेत असलेल्या मूग, उडीद व सोयाबीनला पावसाचा दगाफटका बसल्याने मालाची प्रत खालावली. काही ठिकाणी उडीद, मूगाचा चांगल्या प्रतिचा माल शेतकऱ्यांना मिळू शकला. मात्र सोयाबीनचे क्षेत्र अतिपावसाने नुकसानीच्या दाढेत गेले आहे.

आवक कमी, भाव अधिक!
मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या उडीद, मूगाला पावसाचा आणि रोगराईचा फटका बसल्याने मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. उडीदासाठी प्रतिक्विंटल सहा हजाराचा हमीभाव आहे. अडत बाजारात आवक सुरू झाली असली तरी ती फार मोठ्या प्रमाणात नाही, परंतू उडीदाला प्रतिक्विंटल सहा हजारापासुन ते आठ हजारापर्यंत भाव मिळतो आहे. मागच्या चार दिवसांत उमरगा व मुरुम बाजार समितीत आठ हजारांपेक्षा अधिक भाव होता.

ओव्हरफ्लोमुळे मत्स्यबीज जातेय वाहून, मत्स्य व्यावसायिक चिंतातूर !

गुरुवारी (ता.२४) उमरग्यात सात हजार ८७० तर मुरूममध्ये आठ हजार चाळीस रुपये भाव होता. मूगाचा हमीभाव सात हजार १९६ आहे. सध्या अडत बाजारात चांगल्या प्रतिच्या मालाला सात हजार दोनशे ते नऊशे रूपयांपर्यंत भाव मिळतोय. हा भाव अधिक काळापर्यंत टिकला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. हमी भावाचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. दरम्यान अधिक पाऊस झालेल्या ठिकाणच्या सोयाबीनची अवस्था वाईट आहे. काही मोजक्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू आहे. ओलसर व निकृष्ठ प्रत असल्याने प्रतिक्विंटल साधारणतः साडेतीन हजारांपर्यंत भाव मिळतोय.
 

 

हमी भावाचा फायदा मिळण्यासाठी नोंदणी सुरु आहे. मात्र अडत बाजारातील खुल्या लिलावात उडीदाला चांगला भाव मिळतोय. पोटलीतला जाहीर भाव प्रत्येक शेतकऱ्यांना मिळतोच असे होत नाही. त्यात चांगल्या व निवडक मालाला चांगला भाव दिला जातो. सध्या आवक कमी आहे. आवक वाढली तर हमीभावापेक्षा अधिक भाव खुल्या बाजारात मिळणे अपेक्षित आहे.
- अशिफ मुन्शी, शेतकरी, गुंजोटी

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extra Price Get Above Minimum Support Price For Udad Dal