विधायक : पालावरील कुटुंबियांचे पाणावले डोळे, कशामुळे? ते वाचाच

प्रल्हाद कांबळे
Saturday, 18 April 2020

लाॅकडाउनच्या काळामध्ये ज्यांचे हातावर पोट आहे अशा गरजुंसाठी शहर वाहतुक शाखेकडून मदतीचा हात पुढे केला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या पुढाकारातून कर्तव्यासोबतच सामाजिकतेचीही जोपासना होत असल्याने खाकीलाही माणूसकी असते याचा प्रत्यय सध्या येत आहे. 

नांदेड : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन सुरू आहे. नांदेडमध्येही लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नायगाव रोडवरील तुप्पा लगतच्या जवाहरनगर येथे असेच काही कुटुंब जे डब्बे, चाळण्या विकून पोट भारतात; अशा कुटुंबांना शहर वाहतुक शाखेकडून मदतीचा हात पुढे केला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी त्यांना धान्य वाटप करुन खाकीलाही माणूसकी असते हे दाखवून दिले. 

आनंदाश्रुंनी पाणावले डोळे
फाटक्या तुटक्या कपड्यांनी बांधलेली पाल्ल. रोजगार नसल्याने उन्हात तळपणारी बारकी बारकी पोरं. वाटी, ताटलीही अन्नासाठी तरसावित अशी परिस्थिती. या लोकांना पोलिसांची भलतीच भीती असते. मात्र कर्तव्यावरील बंदोबस्त संपताच वाहतुक शाखेच्या वतीने गरजुंना मदतीचा हात पुढे करत आहेत.

हेही वाचा - Video : विधायक : शहर वाहतूक शाखेने दिला गरजूंना मदतीचा हात

शुक्रवारी (ता.१७) सूर्य डोक्यावर तळपत असताना वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जवाहरनगर येथील पालावर पोहचले. तेथील ५० कुटुंबांना प्रत्येकी १२ किलो धान्याची किट दिली. गहू, तांदूळ, तेल, साबण, मीठ, मिरची डाळ असा धान्याचा यात समावेश होता. हे पाहून पालावर दारिद्र्यात जगणाऱ्या नागरिकांचे डोळे आनंदाश्रुंनी पाणावले होते. 

‘अग्रिकॉस ९१’ मित्रमंडळाने मदतीचा हात
बंदोबस्त करूनही पोलीस थकल्याचे यावेळी बिलकुल दिसले नाही. प्रत्येक कुटुंबाला सामाजिक अंतर ठेवून अन्नधान्य देण्यात आले. कमी पडल्यास पुन्हा येवू मात्र, गुन्हेगारीकारीकडे वळू नका. कोणीही पालाबाहेर जाऊ नका, असा मंत्रही श्री. कदम यांनी यावेळी दिला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली. अन्नधान्य वाटपाच्या या कार्यात वाहतूक शाखेच्या मदतीला ‘अग्रिकॉस ९१’ मित्रमंडळाने मदतीचा हात दिला. गुरुवारी (ता.१६ एप्रिल २०२०) पांगरी येथेही वाहतूक शाखेच्या वतीने गरीब ११ कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले आहे.   

हे देखील वाचाच - लॉकडाऊन: ‘सप्तरंग’ने स्वीकारले वीटभट्टीवरील बारा कुटुंबाचे पालकत्व

सामाजिक कार्यात यांचा आहे सहभाग
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पत्रकार राम तरटे, संघरत्न पवार यांच्यासह हवालदार शैलेंद्र माने, काकासाहेब रोडके, बळीराम धुमाळ, पोलिस नाईक गणेश दाबनवाड, चालक सुरेश लोणीकर, कर्मचारी पंकज इंगोले, अंकुश आरदवाड, अभय जाधव, विनोद पवार, ईश्वर आगलावे, महिला कर्मचारी प्रियांका कदम, ज्योती गायकवाड, सुकेशनी कांबळे आदींचा या सामाजिक कार्यामध्ये सहभाग आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Eyes of the Families on the Bridge Nanded News