लॉकडाऊन: ‘सप्तरंग’ने स्वीकारले वीटभट्टीवरील बारा कुटुंबाचे पालकत्व

शिवचरण वावळे
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

माहिती आणि तंत्रज्ञानामुळे जग एक वैश्विक खेडे बनले खरे; मात्र याच माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसापासून दुरावत चालला होता. हे देखील तितकेच खरे, परंतु संपूर्ण देश ‘कोरोना’च्या कचाट्यात सापडल्याने माणूस माणसाच्या मदतीला अगदी देवासारखा धावून येत आहे. लॉकडाऊनमध्ये अडकुन पडलेल्या विटभट्टीवरील चक्क बारा कुटुबियांचे ‘सप्तरंग’ संस्थेने पालकत्व स्वीकारुन माणूसकीचे दर्शन घडवले.  

नांदेड : येथील सप्तरंगी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाने शहरानजीक असलेल्या वाजेगाव, धनेगाव परिसरातील लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलेल्या एका वीटभट्टीवरील कामगारांची बारा कुटुंबे दत्तक घेऊन आपले दायित्व निभावले आहे. याकामी मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, महासचिव पांडुरंग कोकुलवार, साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी पुढाकार घेत हा अनोखा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात शेकडो कुटुंबे विविध वीटभट्टी कामासाठी वास्तव्य करुन आहेत. लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे तयार मालाला उठाव नाही. त्यामुळे या कुटुंबांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यापैकी एका वीटभट्टीवर वास्तव्यास असलेल्या वजीरगाव, उस्माननगर, उमरा, काबा, गंगाखेड, कामारी येथील एकूण बारा कुटुंबांना साहित्य मंडळाने दत्तक घेतले आहे. अनेक दानशूर लोक पुढे येत असतांना घरात बसून केवळ शब्दांचा भुलभुलैय्या न खेळता आपल्या शब्दांना कृतीची जोड देत इतरांपुढे सप्तरंगी साहित्य मंडळाने आदर्श ठेवला आहे. या कुटुंबांना मंडळाकडून तांदूळ, गहू , दाळ, साखर, मिरची पावडर, तेल यासह इतर जीवनोपयोगी वस्तूंचा आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात येत आहे. 

हेही वाचा- एकीकडे ‘कोरोना’ दुसरीकडे उष्णतेची लाट, कुठे ते वाचा...

गरिबांची चूल पेटणे कठीण​
वीटभट्टीवरील सर्व कामगार कुटुंबे बाहेरगावातील असल्याने त्यांना मोफत तांदूळ व इतर योजनांचे फायदे मिळत नाहीत. मालाला उठाव नसल्यामुळे लाखो रुपयांचा माल पडून आहे. त्यामुळे गोरगरिबांची चूल पेटणे कठीण आहे, असे मुकादम त्रीशरण भदरगे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत सचिन सोनसळे, अनिल सोनटक्के, राहुल गायकवाड, रवी सोनसळे, सुनील वावळे, किरण काटे, दीपक पवार, सुरेश नरवाडे, घनश्याम विश्वकर्मा, एकनाथ भदरगे, बाळासाहेब सोनसळे यांची कुटुंबे असून त्यात लहान मोठे मिळून एकूण ४४ लोक आहेत.

हेही वाचा-  लॉकडाऊन : चक्क नवरीलाच नवरदेवाने आणले दुचाकीवरून घरी

दात्यांनी पुढे यावे​
अशी असंख्य कुटुंबिय आज मदतीच्या प्रतिक्षेत असून, दात्यांनी पुढे यावे असे आवाहन विशालराज वाघमारे, अनिल हनमंते, नागोराव डोंगरे, कैलास धुतराज, शंकर गच्चे, मारोती कदम, प्रशांत गवळे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown: Guardianship Of A Family Of Twelve On A Brick Kiln Accepted By 'Supergirl' Nanded News