फेसबुक लाईव्ह, व्हॉट्सॲप ग्रुपचा उपक्रम मराठवाड्यात, विभागीय आयुक्तांचे आदेश

विकास गाढवे
शुक्रवार, 29 मे 2020

 टाळेबंदीच्या काळात घरात बसून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. नव्या समस्या निर्माण झाल्या. या प्रश्न व समस्यांचे उत्तर देण्याचे काम जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून केले. प्रतिबंधित क्षेत्रामधील नागरिकांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. दोन्ही उपक्रम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना खूप भावले.

लातूर : टाळेबंदीच्या काळात घरात बसून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. नव्या समस्या निर्माण झाल्या. या प्रश्न व समस्यांचे उत्तर देण्याचे काम जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून केले. प्रतिबंधित क्षेत्रामधील नागरिकांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. दोन्ही उपक्रम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना खूप भावले. यामुळेच हे उपक्रम मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत सुरू करण्याचे आदेश त्यांनी गुरुवारी (ता. २८) व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीतून दिले.

टाळेबंदी लागू होताच एकच गोंधळ उडाला. लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याचे अधिकृत उत्तर कोठूनच मिळत नव्हते. कोरोनाची रुग्णसंख्या, कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या अधिकृत उपाययोजना आदींबाबत लोकांच्या मनात संभ्रम होता. जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी यावर फेसबुक लाईव्हचा पर्याय शोधला. दररोज सायंकाळी सात वाजता न चुकता त्यांनी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून प्रशासनाचे निर्णय, उपाययोजनांची माहिती देत लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. याचा चांगला परिणाम झाला. कोरोनामुळे उठणाऱ्या अफवांना आळा बसला. उपाययोजनांबाबत स्पष्टता आली. लोकांमध्ये जागृती होऊन लॉकडाउनमध्ये प्रशासनाच्या उपाययोजनांना प्रतिसाद मिळाला. गेली ६८ दिवस या कार्यक्रमातून अनेक प्रश्नांची सोडवणूक जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केली. फेसबुक लाईव्हसोबत त्यांच्या मोबाईलवर आलेल्या सर्व मेसेजला त्यांनी उत्तरे दिली. अधिकृत उत्तरे मिळू लागल्याने गोंधळ कमी झाला व कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनांना गती मिळाली. या उपक्रमांतून लोकांना विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात आली.

जिल्हाधिकारी ते छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री; जाणून घ्या अजित जोगी यांचा रंजक...

व्हॉट्‍सॲप ग्रुपमधून मदत
कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील केलेल्या भागात चौदा दिवस अनेक समस्यांना लोकांना सामोरे जावे लागले. जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी स्वतः सहभागी होऊन स्वतंत्र व्हॉट्‌सॲप ग्रुप केला. त्यात प्रतिबंधित क्षेत्रामधील प्रत्येक कुटुंबातील एकाला सहभागी करून घेण्यात आले. या ग्रुपमध्ये स्वतः श्रीकांत सहभागी झाले. यामुळे कुटुंबाकडून काही जीवनावश्यक वस्तूंची मागणी झाली किंवा अन्य प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची सोडवणूक करता आली. प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यवस्थेवर नियंत्रण ठेवता आले. हा उपक्रमही यशस्वी झाला. गुरुवारच्या बैठकीत श्री. केंद्रेकर यांनी दोन्ही उपक्रमांचे कौतुक केले व हे उपक्रम मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook Live, Whats app Group Initiative In Marathwada Latur News