दुष्काळझळाः "फकस्त डोळ्यांत पाणी ऱ्हायलंय बघा...'

रविंद्र भताने
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

"लई पावसाळे बघितले पण असलं साल आजपर्यंत बघितलं नाही. गेल्या साली दुष्काळानं पिकं तर गेलतीच अन्‌ पिण्याच्या पाण्यासाठीबी वणवण फिरावं लागलं होतं. वाटलं होतं, खडतर साल हाय, पुढच्या साली पाऊस पडंल अन्‌ सर्व ठीकठाक होईल. पण यंदाही पावसानं आमच्या गावाकडं पाठ फिरवली. अख्ख्या गावात दोनच बोअर सुरू हाईत. मानसं इकतचं पाणी घेत्यात पण जनावरांचं कसं हो? पाऊस पडला नाही तर कसं जगवायचं आम्ही, कशी जगवावी जनावरं? सध्या सगळीकडंच पाणी आटलंय आन्‌ फकस्त आमच्या डोळ्यांत ऱ्हायलंय हाय बघा...' 

चापोलीः  "लई पावसाळे बघितले पण असलं साल आजपर्यंत बघितलं नाही. गेल्या साली दुष्काळानं पिकं तर गेलतीच अन्‌ पिण्याच्या पाण्यासाठीबी वणवण फिरावं लागलं होतं. वाटलं होतं, खडतर साल हाय, पुढच्या साली पाऊस पडंल अन्‌ सर्व ठीकठाक होईल. पण यंदाही पावसानं आमच्या गावाकडं पाठ फिरवली. अख्ख्या गावात दोनच बोअर सुरू हाईत. मानसं इकतचं पाणी घेत्यात पण जनावरांचं कसं हो? पाऊस पडला नाही तर कसं जगवायचं आम्ही, कशी जगवावी जनावरं? सध्या सगळीकडंच पाणी आटलंय आन्‌ फकस्त आमच्या डोळ्यांत ऱ्हायलंय हाय बघा...' 
पंचाहत्तरीतील गुरुलिंग गोरे हे दुष्काळी स्थितीचे विदारक चित्र डोळ्यांत पाणी आणून सांगत होते..


नायगाव (ता. चाकूर) हे 2097 लोकसंख्येचे गाव. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात भुरभुर पाऊस पडल्यावर जेमतेम ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; परंतु मोठा पाऊस न झाल्याने मागच्या दुष्काळात बंद पडलेळे जलस्रोत अद्याप जिवंत झालेले नाहीत. सध्या गावात फक्त दोन कूपनलिका सुरू आहेत.

ग्रामपंचायतीकडून त्या अधिग्रहित झाल्या असून त्यावरच अख्ख्या गावाची तहान भागवली जात आहे. त्यातील एक कूपनलिका बंद पडली तर पाण्यासाठी ग्रामस्थांच्या हालअपेष्टांत भरच पडणार आहे. त्यामुळे आता तरी पाऊस पडावा यासाठी ग्रामस्थ देवाला साकडे घालत आहेत. 

नागनाथ अरदवाड सांगतात, "माझ्याकडं सहा जनावरं हाईत. शेतात पाणी न्हाई म्हणून गावात पाणी सुटलं की घागरी भरून शेतात जाताव अन्‌ जनावरांना पाणी पाजवताव. कुठंच खायला चारा नसल्यानं दीड एकरावरील उसाची तोडणी करून जनावरांना टाकत हाव. पाणी नसल्यानं ऊस तर काय आता येईना, किमान जनावरं तर जगतील हो...' 

823 हेक्‍टरवरील पिके धोक्‍यात 
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 823 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची वाढ खुंटली आहे, तर काही ठिकाणी उगवणच झालेली नाही. 20 हेक्‍टरवर यंदा पेरणीच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे. 

 
सध्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापूर आला आहे. त्याची चित्रे टीव्हीत पाहिली की आमच्या डोळ्यांत पाणीच येतं. तिथं गावे पाण्याखाली आणि आमचं गाव पाण्यासाठी तरसत आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सलग दोन वर्षांपासून शेतकरी अडचणीत आहे. 
- शैलेश कदम, शेतकरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: famine- water left only in eyes