
घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव येथील शेतकरी अशोक अंबादास येवले (वय ४०) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.चार) सकाळी उघडकीस आली.
घनसावंगी (जि.जालना) : घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव येथील शेतकरी अशोक अंबादास येवले (वय ४०) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.चार) सकाळी उघडकीस आली. अशोक येवले हे गुरूवारपासून (ता.तीन ) पासून घरातून गेले होते. रात्री घरी आले नसल्याने कुटूंबीयांनी त्यांचा सकाळी शोध घेतला असता त्यांच्या शेताजवळील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, राणीउंचेगाव येथे पाठविण्यात आला.
मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने परत मृतदेह ग्रामीण रूग्णालय घनसावंगी येथे पाठविण्यात आल्यानंतर सायंकाळी चार वाजता डॉ.शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह शिंदेवडगाव येथे सहा वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर शेतकऱ्यास एक ते दीड एकर जमीन असून यंदा अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे यंदा शेतीतून काही हाती आले नाही. त्यामुळे पुढील उदरनिर्वाहाचा खर्च तसेच बँकेचे व खासगी सावकारांचे कर्ज कसे फेडायच्या? या विवचनेतून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा नातेवाईकाने सांगितले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटूंबीय उघड्यावर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संपादन - गणेश पिटेकर