तुराट्यांचे सरण पेटवून शेतकऱ्याने घेतली उडी...

पंजाब नवघरे
रविवार, 22 मार्च 2020

एका अल्पभुधारक शेतकऱ्याने शेतात तुराट्याचा ढिग पेटवून त्यात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज शनिवार (ता. २१) दुपारी घडली आहे. भारतीय स्टेट बँकेचे साडेतीन लाख रुपये व इतर कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. 

वसमत (जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील पळसगाव येथे कर्जाला कंटाळून एका अल्पभुधारक शेतकऱ्याने शेतात तुराट्याचा ढिग पेटवून त्यात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज शनिवार (ता. २१) दुपारी घडली आहे. भारतीय स्टेट बँकेचे साडेतीन लाख रुपये व इतर कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी बालाजी संभाजी डाखोरे (वय ५५) यांना चार एकर शेत आहे. सध्या या शेतात कापूस, गहू, रब्बी ज्वारीचे पीक आहे. शेतात पेरणीसाठी त्यांनी भारतीय स्टेट बँक शाखा वसमत येथून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या व्यतिरिक्त मागील वर्षी मुलाचे व मुलीच्या लग्नासाठी त्यांनी खासगी कर्ज देखील घेतले होते.यावर्षी खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही, तर रब्बी हंगामातही पिकांचे जेमतेमच उत्पन्न होणार असल्याने कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.

हेही वाचाकोरोना : हिंगोली जिल्हाभरात कडकडीत बंद

शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

दरम्यान, आज सकाळी शेतात कामासाठी जात आहे असे सांगून घरातून शेतात गेले. त्या ठिकाणी तुराट्या गोळा करून त्याचा ढिग केला. त्यानंतर ढिग पेटवून त्यात उडी मारली. शेतातून मोठी आग दिसून येत असल्याने शेजारील शेतात काम करणारा त्यांचा भाऊ प्रभाकर डाखोरे व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभाकर डाखोरे यांनी त्यांना पाय धरून बाहेर ओढले पण तो पर्यंत त्यांचे अर्धे शरीर भाजून त्यांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार बालाजी मिरासे, देवकर, कऱ्हाळे, प्रकाश आवडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी प्रभाकर डाखोरे यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer jumps after burning trumpets hingoli news