
बोरी येथील प्रेमनाथ व खंडू चूलत बंधू हे दोघे दुचाकीवर पाच जानेवीराला निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथे गेले होते. प्रेमनाथ हा त्याच दिवशी रात्री गावाकडे परत आला.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील बोरी येथील चाळीस वर्षीय प्रेमनाथ किसन मदने या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता.आठ) सकाळी स्वतःच्या शेतातील विहिरीच्या काटेवर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान प्रेमनाथचा चूलत बंधू खंडू मदने याचा मृतदेह निलंगा तालुक्यातील लिंबाळा शिवारात आढळून आल्याने गुरुवारी (ता.सात) कासारशिरसी (ता. निलंगा) पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेमनाथला संशयित म्हणुन चौकशीला बोलावून जबर मारहाण केली. त्या भितीने प्रेमनाथने आत्महत्या केल्याचा आरोप प्रेमनाथचा मेव्हूणा संभाजी खांडेकर यांनी केला आहे.
पोलिसांच्या सुचनेनंतरही एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर ; अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकच नाही
या बाबतची प्राथमिक माहिती अशी की, बोरी येथील प्रेमनाथ व खंडू चूलत बंधू हे दोघे दुचाकीवर पाच जानेवीराला निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथे गेले होते. प्रेमनाथ हा त्याच दिवशी रात्री गावाकडे परत आला. सहा जानेवारीला खंडूचा मृतदेह लिंबाळा शिवारात आढळून आल्यांनतर कासारशिरसी पोलिसांनी चौकशी करून मृतदेहाची ओळख पटवली. या प्रकरणी मृत खंडूचा बंधू पंडीत मदने यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात प्रेमनाथ हा खंडूसोबत गेल्याचे म्हटले आहे. मात्र नंतर काय घडले अथवा खंडूला प्रेमनाथने मारहाण केल्याचा उल्लेख नाही. परंतू पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने बोरीचे पोलिस पाटील बालक मदने, माजी सरपंच गणेश नटवे यांना फोन करून प्रेमनाथला चौकशीसाठी घेऊन येण्यासाठी सांगितले.
त्यानुसार गुरुवारी सकाळी कासारशिरसी पोलिस ठाण्यात प्रेमनाथला नेण्यात आले. त्याच्यासोबत त्यांचा हंगरगा (शिर्सी) येथील मेहूणा संभाजी खांडेकर होते. पोलिसांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी केली. दरम्यान सांयकाळी सात वाजता पोलिसांनी प्रेमनाथला शुक्रवारी (ता. आठ) परत चौकशीसाठी येण्यासाठी नोटीस दिली. दरम्यान गुरुवारी रात्री प्रेमनाथ बोरीला आला. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पत्नी मिनाबाई हिला प्रात:विधीसाठी जातो असे सांगून शेताकडे गेला आणि स्वतःच्या शेतातील विहिरीच्या काटेवर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश सुरू केला. उमरगा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रेमनाथचा घटनेशी कांहीही संबंध नसताना पोलिसांनी विनाकारण त्रास देऊन कातडी पट्टाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. गुन्हा कबुल कर .. अन्यथा उद्या तुला यापेक्षा अधिक मारहाण करू अशी धमकी दिल्याने भितीने प्रेमनाथने आत्महत्या केली असून या प्रकरणी कासारशिरसी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार प्रेमनाथचा मेव्हूणा संभाजी खांडेकर यांनी निलंगा येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे केली आहे. दरम्यान प्रेमनाथचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरग्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दुपारी साडेबारा वाजता आणण्यात आला आहे. जोपर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी नातेवाईकांनी भूमिका घेतली होती. या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक पी.ए. गर्जे यांनी प्रेमनाथला संशयित म्हणून चौकशी केली, मारहाण केली नसल्याचे सांगितले.
Edited - Ganesh Pitekar