पिकविमा मंजुरीतील तफावतीमुळे शेतकऱ्यांत नाराजी

NND08KJP02.jpg
NND08KJP02.jpg

नांदेड : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी पीकविमा भरला होता. परंतु, सोयाबीनला विमा मंजूर होताना मंडळा - मंडळांत मोठी तफावत दिसून येत आहे. अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान झालेल्या दुष्काळी तालुक्यांत कमी विमा मिळाल्याने कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याचा आधार कंपनीने घेतला नसल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात किनी मंडळात सोयाबीनला सर्वात कमी एक हजार ८४४ रुपये, तर सर्वाधिक २७ हजार ४१४ रुपये विमा कमी शेतकरी असलेल्या वसरणी या शहरी मंडळात मंजूर झाल्याने कंपनीच्या कामावर शंका उपस्थित होत आहे.

सहा लाख शेतकऱ्यांना ३१३ कोटी ६९ लाख परतावा
खरीप हंगाम २०१९ - २०२० मध्ये जिल्ह्यात पाच पिकांसाठी १२ लाख पाच हजार ३५ अर्जदारांनी सहभाग घेऊन विमा हप्त्यापोटी ४९ कोटी ९५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. या विमा हप्त्यातून पाच लाख ८७ हजार ७७ हेक्टरवरील पिकांसाठी पीकविमा भरला. यातून दोन हजार २४२ कोटी ६१ लाख ४६ हजार ३४१ रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली होती. यापैकी सोयाबीन, ज्वारी व उडीद या पिकांसाठी पीकविमा भरलेल्या सहा लाख तीस हजार ९५७ शेतकऱ्यांना ३१३ कोटी ६९ लाख रुपयांचा विमा परतावा कंपनीने नुकताच मंजूर केला आहे. यात कपाशी तसेच तुरीचे संकलन बाकी असल्याने त्यांचा समावेश नाही.

सोयाबीनसाठी २९७ कोटी ७७ लाख मंजूर
चार लाख १३ हजार २५८ हेक्टरवरील पिकांसाठी मंजूर झालेल्या विम्याची मंडळनिहाय हेक्टरी मंजूर रकमेचा तपशील सध्या मिळू लागला आहे. यात सोयाबीनसाठी पाच लाख १५ हजार ५७४ शेतकऱ्यांच्या तीन लाख ८३ हजार ५५० हेक्टरसाठी २९७ कोटी ७७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर ज्वारीत ७५ हजार ८६९ हेक्टरसाठी २१ हजार ४४० शेतकऱ्यांना १४ कोटी १५ हजारांचा विमा मंजूर झाला आहे. उडदाच्या २१ हजार २४७ शेतकऱ्यांना तीन हजार ८४१ हेक्टरसाठी एक कोटी ४३ लाखांचा विमा मंजूर झाला आहे.

शेतकऱ्यात नाराजी
सोयाबीन विमा मंजूर होताना मंडळनिहाय मोठी तफावत दिसून येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान झालेल्या मुखेड, कंधार, लोहा, नायगाव, उमरी, किनवट, माहूर, भोकर, हिमायतनगर या तालुक्यात शेतकऱ्यांना कमी विमा मिळाला आहे. यामुळे कृषी विभागाने महसूल, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समवेत संयुक्त केलेल्या पंचनाम्यांचा आधार कंपनीने घेतला का, या बाबत शंका उपस्थित केली जात आहे.

सर्वात कमी विमा किनी मंडळात
जिल्ह्यात सोयाबीनला सर्वात कमी एक हजार ८४४ रुपये विमा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील किनी (ता. भोकर) मंडळात मिळाला आहे, तर मुक्रमाबाद मंडळात दोन हजार २५९ रुपये, येवती (ता. मुखेड) दोन हजार ८५३, हणेगाव (ता. देगलूर) तीन हजार २१७ रुपये विमा मंजूर झाला आहे. सर्वाधिक २७ हजार ४१४ रुपये विमा एक हजार ७४२ शेतकऱ्यांनी भरलेल्या शहरी असलेल्या वसरणी मंडळात मंजूर झाला आहे. या सोबतच नांदेड, अर्धापूर, बिलोली, हदगाव, मुदखेड या तालुक्यात विमा मंजुरीचे प्रमाण बरे आहे.

सोयाबीनला मंडळनिहाय मंजूर झालेला पीकविमा
(हेक्टरी मंजूर रक्कम)
नांदेड तालुका : - लिंबगाव - १२,३३६, तुप्पा - १९,०३३, तरोडा - १०,६०२, वसरणी - २७,४१४, विष्णुपुरी - १२,४८०, वजिराबाद - २३,०४८, नांदेड - शहर २१,८००, नांदेड ग्रामीण - ९,०२१.
लोहा तालुका : - कलंबर, माळाकोळी व लोहा बाकी, शेवडी - १४,३२६, सोनखेड - ११,३७८, कापशी बुद्रुक - ८.३२.
कंधार तालुका : - कुरुळा - ६,१००, बारूळ - ६,१५३, पेठवडज - ६,२४७, फुलवळ - ४,७२८, कंधार - ३,९६९, उस्माननगर - ४,९४७.
उमरी तालुका : सिंधी - ७,६६३, उमरी - ५,०३१, गोळेगाव - ५,७२८.
हिमायतनगर तालुका : जवळगाव - ८,७८१, हिमायतनगर - ५,३९६, सरसम - ४,१४७.
नायगाव तालुका :- बरबडा - ७,७७०, नायगाव - ८,७४२, नरसी - ७,८०७, कुंटूर - ८,२१७, मांजरम - ४,३७९.
मुखेड तालुका : चांडोळा - ६,११६, मुखेड - ४,५८९, बाऱ्हाळी - ३, ४४६, जाहूर - ३,९१८, जांब - ३,८०४, येवती - २,८५३.
मुदखेड तालुका : मुगट - १०, ५१९, मुदखेड - ८,५१७, बारड - ११,३६५.
माहूर तालुका : वानोळा - ४,७३५, सिंदखेड - ४,३९९, वाई बाजार - ४,१८९, माहूर - ४,१३०.
किनवट तालुका :- इस्लापूर - ५,०५५, बोधडी - ४,३८४, किनवट - ४,१३४, दहेली - ३,१३२, शिवणी - ३,८६५, मांडवी - ४,१११, जलधारा - ३,५७०.
हदगाव तालुका :- हदगाव - ११,३८६, निवघा - १०,०९४, तळणी - ९,७२०, आष्टी - ७,१०३, पिंपरखेड - ७,९८३, तामसा - ५,७८१, मनाठा - ४,१७१.
धर्माबाद तालुका :- जारीकोट - १०,६८०, धर्माबाद - १४,१७२, करखेली - ४,४८०.
देगलूर तालुका :- शहापूर - १२,९२०, खानापूर - ९,७५३, देगलूर - ७,९३०, हणेगाव - ३,२१७, मरखेल - ४,१०९, माळेगाव (म) - ३,५१७.
बिलोली तालुका :- सगरोळी - १२,५२०, बिलोली - ८,५७४, कुंडलवाडी - १२,१९५, लोहगाव - ७,९२९, आदमपूर - १०,३६३.
भोकर तालुका :- मातूळ - १२,५४८, भोकर - ६,६४८, मोघाळी - ३,६३२, किनी - १,८४४.
अर्धापूर तालुका :- दाभड - १२,२१०, मालेगाव - ९,१०७ व अर्धापूर - ९,८४४.

पीकविमा कमी मिळाला
अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात होऊनही पीकविमा खूपच कमी मिळाला. यातून वर्षभराची गुजरान करणे अवघड झाले आहे.
- शंकर शेटीबा कांबळे, शेतकरी, किनी, ता. भोकर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com