मराठा आरक्षणासंदर्भात ‘या’ दोघांची सकारात्मक चर्चा

अभय कुळकजाईकर
Sunday, 8 March 2020

नांदेड येथे कोल्हापूर संस्थानचे युवराज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांची शिवाजीनगर येथील निवासस्थानी रविवारी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांची मराठा आरक्षणासंदर्भात ‘या’ दोघांची सकारात्मक चर्चा झाली. 

नांदेड - कोल्हापूर संस्थानचे युवराज खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांची शिवाजीनगर येथील निवासस्थानी रविवारी (ता. आठ) सदिच्छा भेट घेतली. या दोन नेत्यांच्या भेटी दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक घेण्यासह मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

युवराज खासदार छत्रपती संभाजीराजे रविवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. नांदेडमधील व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून राजेंनी सायंकाळी चारच्या सुमारास पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. विशेषतः मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण न्यायालयात सिध्द करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा ऊहापोह करण्यात आला. 

हेही वाचा -  वादळी वारा अन् पावसाने पिके आडवी... शेतकरी हताश

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न
मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईमध्ये बैठक घेण्यात येईल. हे आरक्षण टिकले पाहिजे व याचा मराठा समाजातील तरुणांना लाभ मिळाला पाहिजे. या दृष्टीने आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चर्चा करताना सांगितले. त्यासोबतच छत्रपती शाहू महाराज व डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यात असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांना यावेळी उजाळा देण्यात आला.

हेही वाचले पाहिजे -  जिंदा शहिद बिट्टांकडून सीएएचे समर्थन

छत्रपती संभाजीराजेंचा सत्कार
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी युवराज छत्रपती संभाजीराजे यांचा सत्कार केला. यावेळी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर, बबरु महाराज, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष किरण गायकर, नगरसेवक बालाजी जाधव, संतोष पांडागळे, दिनेश बाहेती, युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा. बालाजी गाढे पाटील, छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष राजेश मोरे, श्रीकांत गुंजकर आदींची उपस्थिती होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive discussion of 'these' regarding Maratha reservation