महादेव जानकरांनी घोषणा केलेल्या चाऱ्याच्या रेल्वे कुठे अडकल्या? 

राजेभाऊ मोगल 
सोमवार, 6 मे 2019

औरंगाबाद : पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 6) हंडा मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वे तयार ठेवल्या असल्याची विधीमंडळात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती, मग या रेल्वे कुठे अडकल्यात, असा सवाल शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी येथे केला. 

औरंगाबाद : पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 6) हंडा मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वे तयार ठेवल्या असल्याची विधीमंडळात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती, मग या रेल्वे कुठे अडकल्यात, असा सवाल शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी येथे केला. 

दुष्काळी स्थितीमुळे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. सामान्यांच्या प्रश्‍नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंड्यालाच आपल्या मागण्यांचे स्टीकर लावत मोर्चा काढला. या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले, की राज्यात 1972 पेक्षा मोठा दुष्काळ असताना राज्य सरकारच्या बेजबाबदार पणामुळे जनता मेटाकुडीला आली आहे. 

जिल्ह्यातील खरीपासोबतच रब्बीचीही पिके गेली आहेत. त्यामुळे खान्यासाठी घरात धान्याचा दानाही शिल्लक राहीलेला नाही. पशुधन वाचविण्यासाठी चारा नाही. शेतमजुरांना काम नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह मजूरांना जगण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. पशुसंवर्धन मंत्री महादेव जाणकर यांनी सरकारने चाऱ्याच्या रेल्वे तयार ठेवल्या असल्याची घोषणा विधानसभेत केली होती. मात्र, त्या रेल्वे कुठे अडकल्या माहीत नाही. त्यामुळे चारा आता छावणीला नव्हे तर दावणीला देण्याची गरज आहे. तसेच शेतकरी, मजूरांना विशेष कोट्यातून धान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. 

पैठण तालुक्‍यात जायकवाडी धरण असताना भूमिपुत्रांना एक महिन्यानंतर पिण्यासाठी पाण्याची वाट पाहावी लागते. अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. केंद्र व राज्य सरकारतर्फे दिली जाणारी दुष्काळी मदत अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही, खरीप आणि रब्बीची दोन्ही पिके व फळबागांचे शंभर टक्‍के नुकसान झाले असताना 8 टक्‍के विमा मंजूर झाला. अशी थट्टा यापुढे होता कामा नये, येत्या रविवारपर्यंत (ता. 12) गोदावरीत डाव्या कालव्यात पाणी सोडा, अन्यथा हजारो शेतकरी जायकवाडी धरणात सोमवारी (ता.13) जलसमाधी घेतील, असा इशाराही यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. या मोर्चात शेतकरी, महिला मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers criticizes Mahadev Jankar at Aurangabad