
शेतकऱ्याच्या गुऱ्हाळाला आग; आठ लाखांचे नुकसान
येणेगूर : येथील गोल्या लक्ष्मी शिवारातील गट क्रमांक ४२१ मधील शिवाप्पा रामा माळी यांच्या शेतातील गुऱ्हाळाला अचानक आग लागून गुऱ्हाळातील विविध वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यात सदरील शेतकऱ्याचे अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अधिक माहिती अशी की, येणेगूर येथील शिवाप्पा रामा माळी यांनी मागील दोन वर्षांपासून आपल्या शेतात गुऱ्हाळ सुरू केले होते.बुधवारी (ता. १६) गुऱ्हाळ चालू असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक गुऱ्हाळाला आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे लोकांनी आग अटोक्यात आणण्याचा केलेला प्रयत्न वाया गेला. केवळ दहा ते पंधरा मिनिटांत सर्व काही भस्मसात झाल्याचे राजू माळी, माजी सैनिक सुनील माळी यांनी सांगितले.
या आगीत गुऱ्हाळावरील क्रशरचे महागडे लोखंडी सॉफ्ट व फुली, चार टन ऊस, दोन कढईमधील दोन हजार लिटर रस, १० किलो वजनाच्या तब्बल ६०० गुळाच्या ढेपी, एक किलो वजनाच्या साडे चार हजार ढेपी, एक सायकल, एक स्कूटर जळाली आहे. तसेच इतरही काही साहित्याचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच येणेगुरचे तलाठी गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
Web Title: Farmers Jaggery Fire Causes Loss Lakh Eight Lakh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..