शेतकऱ्यांनी केलाय सोयाबीनचा साठा; भावात कायम चढ-उतार

सयाजी शेळके
Thursday, 3 December 2020

जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाले आहे. एकरी सात ते १० क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना उतारा मिळाला आहे. गेल्या पाच-सहा वर्षात दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनने चांगला आधार दिला आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. असे असले तरी भावात कायम चढ-उतार होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा करून ठेवला आहे. 

जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाले आहे. एकरी सात ते १० क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना उतारा मिळाला आहे. गेल्या पाच-सहा वर्षात दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनने चांगला आधार दिला आहे. यंदा रब्बीच्या पेरणीपासून पावसाचे प्रमाण नियमितपणे सुरू होते. त्यामुळे सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले होते. अंतिम टप्प्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये काही प्रमाणात या पिकांची नासाडी झाली.

हे ही वाचा : डॉक्टरांचे चप्पलच्या नादात गेले सव्वा लाख ; ऑनलाइन फसवणूक, गुन्हा दाखल

विशेषतः नदीकाठच्या गावात सोयाबीनचे जास्त नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीन पिकाची काही प्रमाणात नासाडी झाली असली तरी पहिल्यापासून सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. सुरुवातीच्या काळात तीन हजार ८०० रुपयांचा दर मिळाला. थोड्याच दिवसात सोयाबीन ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचले होते. पुन्हा चार हजार १०० पर्यंत आले. आता पुन्हा चार हजार ३०० रुपयांपर्यंत दर आहेत. पुन्हा दर कमी होत आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या भावात चढउतार होत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच चलबिचल झाला आहे. 
 
दर वाढतील? 

सध्या काही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा साठा आहे. सोयाबीनचे दर वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. त्यामुळे काही शेतकरी अजूनही सोयाबीनची विक्री केलेली नाही. आता या शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळेल अशी अपेक्षा असली तरी दरामध्ये जास्तीची वाढ होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाही सोयाबीनचा दर चार हजार ५०० पेक्षा कमीच राहण्याचे संकेत मिळत आहेत. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Osmanabad district are satisfied with the good price of soybean