येथील शासकीय महिला रूग्णालयातील डॉ.चंद्रकांत लामतुरे यांनी एका ऑनलाइन पोर्टलवर ४७० रुपयांची चप्पल मागविली होती. काही कारणाने कंपनीने ती ऑर्डर रद्द झाल्याचे डॉ.लामतुरे यांना एसएमएसद्वारे कळविले. यावर डॉ. लामतुरे यांनी पोर्टलवरील एका मोबाईल फोनवर (ता. ३०) नोव्हेंबरला संपर्क साधला.
उस्मानाबाद : ऑनलाइन पोर्टलवर मागविलेली चप्पल आली नाही, उलट सव्वा लाखाची रक्कम मात्र गमावून बसल्याचा प्रकार शहरातील एका डॉक्टरांच्या बाबतीत घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील शासकीय महिला रूग्णालयातील डॉ.चंद्रकांत लामतुरे यांनी एका ऑनलाइन पोर्टलवर ४७० रुपयांची चप्पल मागविली होती. काही कारणाने कंपनीने ती ऑर्डर रद्द झाल्याचे डॉ.लामतुरे यांना एसएमएसद्वारे कळविले. यावर डॉ. लामतुरे यांनी पोर्टलवरील एका मोबाईल फोनवर (ता. ३०) नोव्हेंबरला संपर्क साधला.
यावेळी समोरील व्यक्तीने पैसे परत करण्याच्या बहाण्याने डॉ.लामतुरे यांच्याकडून डेबीट कार्डवरील १६ अंकी क्रमांक व कार्डच्या पाठीमागील तीन अंकी सीव्हीव्ही क्रमांक घेतले. त्यानंतर डॉ.लामतुरे यांच्या मोबाईल फोनवर एक लाख २७ हजार ७१४ रुपये ट्रान्सफर होण्याकरिता ओटीपी संदेशही आला. तो त्यांनी फोनवरील व्यक्तीस सांगितला. परिणामी डॉ.लामतुरे यांच्या बॅंक खात्यातील एक लाख २७ हजार ७१४ रुपयांची रक्कम समोरील व्यक्तीने अन्य खात्यांवर वळवून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ.लामतुरे यांनी पोलिसांत धाव घेतली.
व्यवस्थापकाने केला अपहार
रूपामाता मल्टीस्टेट सोसायटीच्या आरळी (बु) येथील शाखेचे सय्यद माजीद नासीर जहागीरदार हे व्यवस्थापक आहेत. २० जून २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या काळात जहागीरदार यांनी पिग्मी तारण कर्ज, पिग्मी बचत ठेव खातेदारांच्या बनावट सह्या करून व बनावट कागदपत्र बनवून आणि शाखा सह व्यवस्थापक व क्लार्क यांचा पासवर्ड चोरून शाखेच्या संगणक अभिलेखात बदल करून आठ लाख ८५ हजार ६२१ रुपयांचा अपहार केला असल्याची तक्रार शाखा सहव्यवस्थापक सत्यनारायण बोधले यांनी दिली आहे. नळदुर्ग पोलिस ठाण्यात त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले