परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना हवी आर्थिक मदत

pik kh 777
pik kh 777

परभणी ः जिल्ह्यात होत असलेला पाऊस हा काही तालुक्यात दिलासादायक तर कुठे त्रासदायक ठरत आहे. यामुळे काही ठिकाणी तालुकानिहाय ओले दुष्काळ जाहीर करा, आर्थिक मदत त्वरीत द्या यासह विविध मागण्या शासन दरबारी विविध पक्ष, संघटना आणि पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळे कुठे पावसाची साथ चांगली तर कुठे पडणारा पाऊस संकट वाटत आहे.
    
विहीर भरली काठोकाठ, सर्वत्र पाणीपातळी वाढली 
देवगावफाटा : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी संकटाची मालिका घेऊन आला आहे. पावसाने धारण केलेले विचित्र रूप पिकांचे नुकसान करीत आहे. सुरवातीला अतिपावसामुळे मुग, उडीदाच्या शेंगाना कोंब फुटल्याने नुकसान झाले असतांना आता टच्च भरलेल्या सोयाबीनच्या शेंगा सततच्या पावसामुळे भिजल्याने या शेंगानाही अंकुर फुटत असल्याचे चित्र देवगावफाटा परिसरात पहायला मिळते. मुग, उडीद पिकांचे नुकसान होऊन या पिकांना कोंब फुटले तर आता सप्टेंबर महिन्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून काढणीला सुरवात होत नाही तोच सोयाबीनवर नवीन संकट आले असून आता हिरव्या शेंगानाच अंकुर फुटले. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यामुळे सोयाबीनचे पिकच उपटून फेकण्याची तयारी काही शेतकऱ्यांनी सुरू केली. जूनच्या सुरवातीपासूनच समाधानकारक व वेळेवर पाऊस पडत असल्याने पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. आजघडीला परिसरातील सिंचन विहिरी काठोकाठ भरल्या आहेत. गेल्या चार ते पाच वर्षापासून विहिरी पूर्ण क्षमतेने भरल्या जात नसल्यामुळे ज्वारीची पीके येत नव्हती. हा भाग खरीप व रबी या दोन हंगामातील पिकावरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाकरीता विहीर हाच शेतकऱ्यांसाठी प्रमुख पर्याय आहे. यंदा विहिरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने रबी ज्वारीसह हरभरा व गव्हाचा पेरा वाढण्याचा अंदाज आहे. 

शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या 
पूर्णा ः पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली. या वेळी विलास कदम, विनय कराड, विजय कराड, देवानंद वळसे, विश्वनाथ होळकर, गोविंद ठाकूर, स्वप्नील तवर उपस्थित होते.ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिक वीमा तत्काळ द्यावा व कांदा निर्यात बंदी उठवण्यात यावी अशी मागणी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष पंकज कऱ्हाळे, गोविंद आवरगंड, विश्वांभर वंजे, बालाजी सुर्यवंशी, मंगेश एकलारे, दयानंद आवरगंड, अतुल तांबे, आदिनाथ आवरगंड यांनी निवेदन देवून केली. त्याचबरोबर भाजप युवा मोर्चाचे रामेश्वर भोसले, बालाजी भोसले, योगेश भोसले, अनंता पावडे, गोविंद भोसले यांनीही निवेदन दिले. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावल्या गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता कसे जगावे, देणे व बॅंकांचे कर्ज कसे फेडावे ? असा सवाल करत सरकारनेच ओला दुष्काळ जाहीर करून आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी गंगाधर वाळवंटे यांनी केली. 

सततच्या पावसाने राजुरा परिसरात पीके सडू लागली
सेलू : राजूरा परिसरात असलेल्या शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले असून आठवडाभरापासून होत असलेल्या पावसाने उभ्या पिकांचे  नुकसान झाले. त्यामूळे हातातोंडाशी आलेली पीके सततच्या पावसामूळे सडून जात असल्याने शेतकरी वर्ग चिंगाग्रस्त झाला आहे. तालूक्यात सारखा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना मुगाचे उभे पिक सोडुन द्यावे लागले होते. तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासुन पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने चांगलाच जोर धरल्याने तालुक्यातील सर्वच शेतात पाणी जमा झाले. त्यामुळे शेतातील उभे पिके कोमजुन गेली असून आत्ता सडू लागली आहे. मुगा पाठोपाठ सोयाबीन, कापुस, तुर, हळद, उडीद, ऊस तसेच फळ बागायती धोक्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसत आहे. राजुरा, आडगाव (दराडे), मापा, राव्हा ही गावे करपरा नदी पात्रालगत असून या गावातील बहुतांश शेतकऱ्यांची जमीन ही निवळी धरणाजवळ आहे. आणि निवळीचे धरण हे क्षमतेपेक्षा जास्त भरून ओसंडून वाहत असल्यामूळे धरण क्षेत्राजवळील शेतातील पिकांना धोका निर्माण झाला आहे.

पिकांची नुकसानभरपाई देण्याची मागणी
जिंतूर ः सततच्या पावसामुळे झालेल्या पिकहानीबद्दल नुकसानभरपाई देण्याची मागणी तालुक्यातील भोसी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत सोमवारी (ता.२२) तहसीलदारांना निवेदन दिले. भोसी शिवारात मागील आठदिवसापासुन सुरु असलेल्या अती पावसामुळे खरिप पिकांना फटका बसला असून काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाला कोंब आले आहेत, कापुस पिकाची बोंडे सडत आहेत. शासनाने या बाबतीत तत्काळ निर्णय घेउन पिक पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी विष्णू महाराज ठोंबरे, सुभाष महाराज ठोंबरे, भास्कर रावसाहेब ठोंबरे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी तहसिलदार सुरेश शेजूळ यांना गावकऱ्यांच्यावतीने निवेदनात केली आहे.

पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, संकटे सुरूच
पालम: तालुक्यात मागील आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत करत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात येणारे पाणी आता सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणी येत असल्याची परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. तालुक्यातील सरासरीचा विचार केल्यास पालम मंडळात १९ मिलीमीटर, चाटोरी ११ तर बनवस मंडळात ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात जवळपास शंभर टक्के पावसाने आजपर्यंत हजेरी लावली. पडलेल्या पावसाने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. मुसळधार बरसून शेतीसकट माल डोळ्यासमोर वाहताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहेत. रात्री धो-धो पडल्यानंतर शेतकरी सकाळीच शेती गाठून आपल्या पिकांची राखरांगोळी झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत होते. झालेल्या पावसाने उभ्या कपाशीच्या बोंडांना कोंब फुटले आहेत. अधिक पावसामुळे तूरीचे नुकसान झाले. सोयाबीनमधून कोंब बाहेर येताना दिसत आहेत. अनेकांची सोयाबीन, पाण्यावर तरंगत असून जवळपास पन्नास टक्के पिके वाया गेली. जमिनीवर पडलेल्या कपाशीची बोंडंही सडून गेली आहेत. पुराचे पाणी शेतामध्ये शिरत आहे. नदी, नाल्यांमध्ये वाहणारे पाणी शेतातून वाहताना दिसत आहे. दरम्यान, पाऊस उघडीप देत नसल्याने रब्बी पेरणीसाठी शेती तयार करणेही अवघड झाले आहे. पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांचे अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com