शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको, जालना-बीड महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रंगा

बाबासाहेब गोंटे
Tuesday, 15 September 2020

जालना जिल्ह्यातील मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, ऊस उत्पादक शेतकरी यांचे सततच्या पावसामुळे, नैसर्गिक आपत्ती, रोगराई यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

अंबड (जि.जालना) : जालना जिल्ह्यातील मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, ऊस उत्पादक शेतकरी यांचे सततच्या पावसामुळे, नैसर्गिक आपत्ती, रोगराई यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी जालना-बीड महामार्गावरील सुखापुरी फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

प्रशासनाला यापूर्वीच रस्ता रोको आंदोलनाबाबत लेखी निवेदन सादर करून रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. सुखापुरी फाटा येथे मंगळवारी (ता.१५) सकाळी दहा वाजता दहा ते पंधरा मिनिटे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती.

हेडमास्तर होण्यासाठी आठशे शिक्षकांची नकारघंटा, पदोन्नतीला सतराशे विघ्न

आंदोलन स्थळी अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी देशपांडे, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संतोष कड, सुरासेसह आदी तैनात होते. या प्रसंगी मंडळ अधिकारी दिवाकर जोगलादेविकर यांना शेतकरी प्रकाश बोर्डे, सुरेश काळे, पांडुरंग गटकळ, राधाकिसन मैद, रामजी काळे यांच्यासह शेतकऱ्यांनी गळ्यात मोसंबी फळाच्या माळ घालून निवेदन दिले. यावेळी रास्ता रोको आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील प्रमुख पिके
मोसंबी, डाळिंब आणि द्राक्ष ही प्रमुख पिके आहेत. जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने या पिकांमोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मोसंबी व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Rasta Roko Agitation For Compensation Jalna News