'कांद्या'ला वाचविण्यासाठी केली जातेय देशी दारुची फवारणी| Onion | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा
कांद्याला वाचविण्यासाठी केली जातेय देशी दारुची फवारणी

'कांद्या'ला वाचविण्यासाठी केली जातेय देशी दारुची फवारणी

परंडा (जि.उस्मानाबाद) : शेतीतील उत्पादन दर्जेदार व मोठ्या प्रमाणात व्हावे. यासाठी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले जातात. काही विज्ञानाच्या आधारे केले जातात, तर कधी शेतकरी स्वतः काही निर्णय घेतो. याचा अनुभव अनेक वेळा येतो. एकाने प्रयोग केला की अनेक जण तसाच प्रयोग सुरु करतात. याचाच एक भाग म्हणून कांद्याचे पिक चांगले भरलेले दिसावे. कांद्याला (Onion) चकाकी यावी, यासाठी अनेक शेतकरी कांद्याच्या पिकावर देशी दारूची फवारणी करीत असल्याचे चित्र असून तरतरीसाठी काद्यांला दारू पाजली जात आहे. पाण्याची मुबलक सोय झाल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे परंडा (Paranda) तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात काद्यांची लागवड केली जाते. तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बार्शी, सोलापूर येथील कांद्याला मिळणार भाव येथील बाजारपेठेत शेतकऱ्यांना मिळत आहे. परिसरातील सर्वांत मोठे कांद्याची बाजारपेठ अशी परंडा येथील बाजारपेठेची ओळख निर्माण झाली आहे. येथील बाजार पेठेत करमाळा, जामखेड, भूम, कुर्डुवाडी, माढा, टेभुर्णी, कर्जत, राशीन या भागातील शेतकरी येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांद्याच्या विक्रीसाठी घेऊन येत आहेत. (Osmanabad)

हेही वाचा: 'सिनेमा बनवला,पैसे कमावले; त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते'

कांद्याची बाजारपेठ उपलब्ध असल्याने उसाच्या प्रमाणात कांद्यांची लागवड होत आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकरी वर्गातून वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. धुई पडल्यामुळे कांद्याची पात जळते. कांद्यावर रोग पडतो. यातून कांद्याला वाचविण्यासाठी कांद्यावर फवारणी करताना काही प्रमाणात देशी दारु वापरली जाते. देशी दारुच्या फवारणीमुळे व्हायरसची बाधा होत नाही. रोग पडत नाही. कांदा फुगतो, त्याला रंग येतो. तसेच कांद्याला तरतरी येते, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कांद्यांच्या तरतरीसाठी कांद्यावर दारूची फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

टॅग्स :Onion Crop