अवैध दारूविक्री बंदसाठी महिलांचे उपोषण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

केज (जि. बीड) - तालुक्‍यातील आडस येथे अवैधरीत्या होणारी दारूविक्री बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी पोलिस दूरक्षेत्र कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. सहा) सकाळी अकराला बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. दारूबंदी होऊनही उपोषण करण्याची वेळ आल्याने स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांबाबत महिलांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात साधारणपणे बारा हजारांच्या पुढे लोकसंख्या व मोठी बाजारपेठ असणाऱ्या गावात 15 जुलै 2011 रोजी लोकशाही मार्गाने मतदान प्रक्रिया पार पाडून बाटली आडवी करून दारूबंदी होणारे आडस हे एकमेव गाव ठरले. त्यामुळे परवानाधारक दारूविक्रीची सहा दुकाने बंद झाली.

राज्याच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाकडून परवानाधारक दारूविक्रीच्या दुकानांचे वेळापत्रक ठरविण्यात आले. तरीही आडस येथे अवैधरीत्या दारूविक्रीच्या अड्ड्यांवर चोवीस तास होणारी विक्री थांबविण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आले आहे. सध्या हॉटेल व ढाब्यांवर विनापरवाना दारूविक्री होत आहे. बनावट दारूच्या आहारी गेलेल्या तरुणांचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. सध्यातरी महिलांनी दिलेला दारूबंदीचा लढा व्यर्थ गेल्याचे दिसून येत आहे.

गावात बनावट दारूसारख्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेक जणांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अवैधरीत्या दारूविक्रीकडे स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अवैधरीत्या होणारी दारूविक्री बंद करा, सखोल चौकशी करून गोविंद वाघमारे यांच्यावर झालेला गुन्हा मागे घ्या व दारूच्या व्यसनाने मृत्यू झालेल्या अनंत लगसकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी सविता आकुसकर, श्रीमती शेषाबाई निंगुळे, सुमनबाई वाघमारे, सुनीता जोगदंड, नागरबाई वाघमारे व जिजाबाई क्षीरसागर या बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत.

या अवैधरीत्या दारूविक्रीकडे स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अवैधरीत्या होणारी दारूविक्री बंद करण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशी उपोषणस्थळी एकाही पोलिस अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने रात्री उशिरापर्यंत उपोषण सुरूच होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com