बीडमध्ये नियम फाट्यावर - जामखेडवरून बापलेकींचा भरदिवसा विनाअडथळा पाटोद्यात प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

पाटोदा शहरातील एका पित्याने जामखेडमध्ये असलेल्या आपल्या लेकीला पाटोदामध्ये आणण्यासाठी आश्चर्यकारकरीत्या जामखेडमध्येही प्रवेश केला व तेथूनही सर्व बंदोबस्ताचे अडथळे बिनदिक्कतपणे पार करत कुठल्या तरी चोरवाटेने भर दिवसाच आपल्या लेकीला घेऊन पाटोदा शहरात दाखल झाला.

पाटोदा (जि. बीड) -  शहराजवळच असलेल्या जामखेडमधून छुप्या मार्गाने सर्व नियम मोडून एक पिता आपल्या लेकीला घेऊन आल्याने व प्रशासकीय विभागाचा एक बडा अधिकारी रेड झोनमधून शहरात दाखल झाल्याने सोमवारी शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, त्यांच्यासह अन्य तिघा व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले असून, प्रशासनाच्या विविध विभागाच्या अनेक तासांच्या खलबतानंतरही यासंदर्भात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती. 

पाटोदापासून जवळच असलेल्या; परंतु भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्ह्यात असलेल्या जामखेड शहरात मागील काही दिवसांत तब्बल सतरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकाच खळबळ उडाली होती व त्या ठिकाणी संपूर्ण शहर रेड ॲलर्टवर होते. जामखेडमुळे बीड जिल्हा प्रशासनाने देखील सरहद्दीवरील सर्व सीमारस्ते बंद केलेले होते व सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता; मात्र असे असताना सोमवारी पाटोदा शहरातील एका पित्याने जामखेडमध्ये असलेल्या आपल्या लेकीला पाटोदामध्ये आणण्यासाठी आश्चर्यकारकरीत्या जामखेडमध्येही प्रवेश केला.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

तेथूनही सर्व बंदोबस्ताचे अडथळे बिनदिक्कतपणे पार करत कुठल्या तरी चोरवाटेने भर दिवसाच आपल्या लेकीला घेऊन पाटोदा शहरात दाखल झाला; मात्र आजूबाजूच्या रहिवाशांना याची कुणकुण लागल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली व त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन हालचाली सुरू झाल्या. अखेर त्याठिकाणी या बापलेकींसह अन्य तिघांना २८ दिवस क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे, तर सोमवारीच शहरातील एका प्रशासकीय विभागातील एक अधिकारीही रेड झोनमधून आपल्या चालकासह शहरात दखल झाल्याची चर्चा असून, संबंधित अधिकाऱ्याकडे परवाना असल्याचीही माहिती समोर येत आहे व त्याला देखील क्वारंटाइन केले असल्याचे सांगण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father and daughter travel from Jamkhed to Patoda