
परभणी महापालिकेतील कामचुकारांवर पालिका प्रशासनाने चौकशी व कारवाईचे अस्त्र उगारले असून त्यातून मोठ्या संख्येने असलेल्या कामचुकारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
परभणीः महापालिकेतील कामचुकारांवर पालिका प्रशासनाने चौकशी व कारवाईचे अस्त्र उगारले असून त्यातून मोठ्या संख्येने असलेल्या कामचुकारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या विविध विभागात कामचुकारांची संख्या देखील मोठी आहे. सूचना न देता गैरहजर राहणे, महिणो-महिणे अनुपस्थितीत राहणे, दिलेली कामे न करणे, विभाग सोडून अन्यत्र कामे करणे, मागेपुढे फिरणे अशा विविध प्रकारचे कर्मचारी आहेत. महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी दोन्ही उपायुक्त रुजू झाल्यानंतर प्रशासन गतीमान करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा पहिला फटका वर्षानुवर्षापासून एकाच भागात काम करणाऱ्या वसुली लिपीकांना बसला. त्या सर्वांचे वसुली क्षेत्रच नाही तर प्रभाग समित्या देखील बदलण्यात आल्या आहेत.
आस्थापना विभागाकडून कामचुकारांचा शोध
आस्थापना विभागाचे प्रमुख उपायुक्त महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख हे अशा कामचुकारांचा शोध घेत असून विविध विभाग प्रमुखांकडून माहिती मागवली जात आहे. त्याचबरोबर मासिक हजेरीपट देखील तपासले जात आहेत. कंत्राटी, रोजंदारी, कायम अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी केली जात असून त्यामध्ये अनियमितता असल्यास विभाग प्रमुखांना जबाबदार धरले जात असल्याची माहिती आहे. नुकतेच मलेरिया व भांडार विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्यावर कार्यवाही प्रस्तावित केली जाणार असल्याची माहिती आहे. विना परवानगी हे कर्मचारी एक-दोन महिण्यापासून गायब असल्याचे बोलले जाते.
हेही वाचा - प्रवासी वाढविणार कोरोना! संचखंडमधून २२ तर विमानातून चार जण पॉझिटिव्ह
विभाग प्रमुखांची पाठराखण
वास्तविक पाहता कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणास विभागप्रमुखच जबाबदार आहेत. काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत प्रशासनाकडे अभावानेच तक्रार केली जाते. काम न करणारे, उपस्थित न राहणाऱ्यांना विविध कारणांमुळे सवलती दिल्या जात असल्यामुळे कामचुकारांची संख्या वाढू लागली आहे.
हेही वाचा - शेतकरी जगला पाहिजे हीच आमची भूमिका : उपमुख्यमंत्री अजित पवार
बदली कामगाराचा पॅटर्न
महापालिकेच्या विविध विभागात बदली कामगार, कर्मचाऱ्यांच्या पॅटर्न बाबत नेहमीच चर्चा होते.मुळ कर्मचारी अशा बदली कर्मचाऱ्याला कामाला लावून स्वःता नामानिराळे राहतात. बदली कर्मचाऱ्याला स्वतःच्या वेतना चार-दोन हजार रुपये मासिक वेतन देतात, असेही बोलले जाते. असे बदली कर्मचारी देखील विविध महत्वाच्या पदांवर काम करीत असल्याचे बोलले जाते. प्रशासनाने आता अशा बदली कर्मचारी नियुक्त करणाऱ्या व त्यांना अभय देणाऱ्या विभाग प्रमुखांवर देखील कारवाईचा आसुड उगारणे गरजेचे झाले आहे.
गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित
महापालिकेत अगोदरच कामे जास्त व कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. असे असताना कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अडथळे निर्माण होत आहेत. अशा अधिकृतरित्या गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिका अधिनियमानुसार आयुक्तांकडे कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.- महेश गायकवाड, उपायुक्त, मनपा. परभणी.
संपादन ः राजन मंगरुळकर