esakal | हिंगोलीत दुपारनंतर जाणवतोय शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli city

हिंगोली शहरात पाच दिवसांनंतर शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळात पाच ठिकाणी बाजार भरला होता. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. बाजारांची वेळ संपताच नागरिकांची रस्‍त्यावरची गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 

हिंगोलीत दुपारनंतर जाणवतोय शुकशुकाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे संचारबंदी सुरू आहे. शहरात पाच दिवसांनंतर शुक्रवारी (ता. दहा) सकाळी बाजार भरला होता. बाजाराची वेळ संपताच दुपारनंतर मात्र रस्‍त्‍यावर शुकशुकाट जाणवत होता.

संचारबंदीमुळे बहुतांश नागरिक घरीच थांबणे पसंत करीत आहेत. रस्‍त्यावर विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिक पालन करीत असल्याचे चित्र आहे. पाच दिवसांनंतर शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळात पाच ठिकाणी बाजार भरला होता. 

हेही वाचा - कोरोनाच्या लढाईत हिंगोलीत घडतेय माणुसकीचे दर्शन

शहरात गस्‍त सुरू

बाजारांची वेळ संपताच नागरिकांची रस्‍त्यावरची गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, पोलिस प्रशासनातर्फे सकाळपासून शहरात गस्‍त सुरू होती. गर्दी करून नका, बाजाराची वेळ संपली आहे, घरी जा, असा सूचना ध्वनीक्षेपकावरून दिल्या जात होत्या. बाजाराची वेळ संपल्यानंतर रस्‍त्यावर शुकशुकाट जाणवत होता.

४१ अंशांवर तापमान

 काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने चटके बसण्यास सुरवात झाली आहे. शुक्रवारी ४१ अंशांवर तापमान गेले होते. त्‍यामुळे शहरात सुरू असलेली संचारबंदी व तापत असलेल्या उन्हामुळे नागरिकांनी घरीच थांबणे पसंत केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

औंढा नागनाथ येथे पोलिसांचे पथसंचलन

औंढा नागनाथ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे शहरात शुक्रवारी (ता. दहा) पथसंचलन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. त्‍यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. 

पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहरात पथसंचलन करण्यात आले आहे. या वेळी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलिस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक सविता वाळके यांच्यासह कर्मचारी अफसर पठाण, राजकुमार सुर्वे, इक्बाल शेख, गणेश नरोटे, यशवंतराव गुरुपवार, बंडू घुगे, खिजर पाशा यांच्यासह राज्य राखीव दलाची तुकडी, वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला.

केशरी रेशन कार्डधारकांनाही मिळणार धान्य

कळमनुरी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात येत आहे. परंतु, अनेक केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आमदार संतोष बांगर यांच्याकडे आल्या होत्या. केशरी कार्डधारक लाभार्थींनाही धान्य वाटप करावे, अशी मागणी श्री. बांगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. 

येथे क्लिक करासण, उत्‍सव घरीच साजरे करा : पोलिस अधीक्षक योगेशकुमार

आठ रुपये किलो प्रमाणे गहू

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सवलतीच्या दराने धान्य देण्याबाबत शासन आदेश काढण्यात आला आहे. मे आणि जून महिन्यात एपीएल केशरी कार्डधारक लाभार्थींना आठ रुपये किलो प्रमाणे प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व बारा रुपये किलो प्रमाणे प्रतिव्यक्ती दोन किलो तांदूळ असे पाच किलो अन्नधान्य वितरीत करण्यात येणार असल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले.