कोरोनाच्या लढाईत हिंगोलीत घडतेय माणुसकीचे दर्शन

Hingoli Bharari Photo
Hingoli Bharari Photo

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाबाधित एक रुग्ण आढळल्याने प्रशासनाने जिल्हाभरात संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाउनही पाळले जात आहे. यात अनेक परप्रातीय नागरिक जिल्ह्यात अडकून पडले आहेत. तसेच सर्व कामे ठप्प पडल्याने कामगारांसमोर उदरनिर्वाहांचा प्रश्न निर्माण झाला आहे. 


त्यामुळे सामाजिक संस्था, संघटना, कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती गरजूंच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. हिंगोली नगरपालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. संकटाच्या काळात मिळत असलेल्या मदतीमुळे जिल्हाभरात माणुसकीचे दर्शन घडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

१६४ दिव्यांगांना नगरपालिकेचा आधार

हिंगोली : गरजूंच्या मदतीसाठी दानशूरांनी जमा केलेल्या अन्नधान्य, इतर साहित्य वाटपाचे नियोजन करत गुरुवारी (ता. नऊ) नगरपालिकेने शहरातील १६४ दिव्यांगांना जीवनाश्यक वस्‍तूंचे घरपोच वाटप केले. यात पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, एक किलो खाद्यतेल, डेटॉल साबन, हॅंडवॉश, सॅनिटायझर, मास्‍क आदी वस्‍तूंचा समावेश आहे. तसेच ३२ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती ऑनलाइन जमा करण्यात आली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. पी. शिंदे, श्‍याम मनवर, पंडित मस्‍के, ललिता खंदारे, प्रवीण चव्हाण आदी कर्मचारी पुढाकार घेत आहेत.

अडीच हजार गरजूंना भरारी मित्र परिवारातर्फे अन्नदान

हिंगोली : शहरातील खटकाळी व अकोला बायपास परिसरात पालावरती अनेक कुटुंब राहात आहेत. कामधंदे बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गरजू नागरिकांना दानशूर व्यक्तींनी, स्वयंसेवी संस्थांनी मोफत अन्नधान्य व अन्नदान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्याला प्रतिसाद देत भरारी मित्र परिवार, आमदार तान्हाजी मुटकुळे, गायत्री शक्ती परिवार यांनी अन्नदान करण्यास सुरवात केली आहे. गरजू नागरिकांना दररोज दोन वेळेस मोफत जेवणाची व्यवस्था झाली आहे. शहरातील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात शिवभोजनामार्फत दररोज दोनशे थाळींचे वाटप होत आहे. आता तालुका स्तरावरदेखील शिवभोजन थाळी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली असल्याने गरजू नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाखांची मदत

आखाडा बाळापूर : येथील सामाजिक कार्यकर्ते सखाराम अग्रवाल तसेच ॲड. बापूसाहेब येगावकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रत्‍येकी एक लाख रुपयांचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे गुरुवारी (ता. नऊ) सुपूर्त केला आहे. या वेळी संजय अग्रवाल, श्याम अग्रवाल, ॲड. येगावकर यांची उपस्थिती होती.

सपाटे, भिसे यांच्याकडून आर्थिक मदत

हिंगोली: तालुक्यातील खरबी येथील नामदेव सपाटे व शहरातील एनटीसी भागातील यश मछिंद्रनाथ भिसे यांनी वाढदिवसांचा खर्च टाळून अन्नछत्रासाठी प्रत्येकी एक हजार १०० रुपयांची मदत केली आहे. संकट काळात कोणीही उपाशी राहू नये, पालवारील लोकांना मोफत जेवण मिळावे यासाठी गरजूंना मोफत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी मदत म्हणून नामदेव सपाटे, यश भिसे यांनीही रक्कम सुपूर्त केली आहे.

जनकल्याण संस्‍थेतर्फे गरजूंना अन्नदान

हिंगोली: येथील जनकल्याण सेवाभावी संस्थेतर्फे शहरात इंदिरानगर, खुशालनगर, बावन खोली भागात दररोज ११० गरजू लोकांना एक वेळचे अन्नदान केले जात आहे. या वेळी संस्‍थेचे अध्यक्ष जावेद राज, फेरोज खान पठाण, मोईज बागवान, गुफरान खान, जुनैद शेख,मोहम्मद गौस, मुकरम जहागीरदार, अलतफ खान, जुबेर पठाण, शेख आरेफ, इम्रान खान, मझर खान यांनी पुढाकार घेतला आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com